दगडफेकीने पिंजऱ्यातील अस्वल पसार
By admin | Published: February 4, 2017 12:16 AM2017-02-04T00:16:23+5:302017-02-04T00:16:23+5:30
तालुक्यात एका अस्वलाने पिलांसह चांगलाच धुडगुस घातला आहे.
सहा महिन्यांच्या परिश्रमावर पाणी : गावकऱ्यांकडून झाली पिंजऱ्यावर गोटमार
आष्टी (शहीद) : तालुक्यात एका अस्वलाने पिलांसह चांगलाच धुडगुस घातला आहे. या अस्वलाच्या हल्ल्यात सहा महिन्यात आठ शेतकरी गंभीर जखमी झालेत. या अस्वलाला पकडण्यासाठी एसआरपीच्या २७ जवानांसह ४२ जणांची टीम जंगलात कोम्बींग आॅपरेशन राबवित होती. या आॅपरेशनला यश आल्याने दोन दिवसांपूर्वी बोरखेडीच्या जंगलात लावलेल्या पिंजऱ्यात अस्वल जेरबंद झाले; मात्र मोई व थार येथील गावकऱ्यांनी ऐनवेळी पिंजऱ्यावर जोरदार दगडफेक केली. यात पिंजऱ्याचे लोखंडी गज तुटल्याने अस्वल पळून गेले. हातची संधी हुकल्याने परत अस्वल कधी सापडेल, असा पेच वनविभागासमोर आहे.
वनपरीक्षेत्र अधिकारी अमोल चौधरी यांनी अस्वलाला शोधण्यासाठी गावकऱ्यांकडून उपाय सूचविण्याचे आवाहन केले होते. १० गावातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे सदस्य यांची संयुक्त मिटींग घेतली होती. तेव्हापासून युद्धपातळीवर दिवसरात्र कोम्बींग आॅपरेशन सुरू केले होते. एसआरपीचे २७, वनरक्षक १५ असे एकूण ४२ कर्मचारी प्रत्येक भागात चोख बंदोबस्त लावून शोध घेत आहे. यासाठी गावकऱ्यांनीही भरभरून प्रतिसाद दिला होता. वनविभागाला अस्वल जेरबंद करण्याचे मोठे आव्हान होते. ते पूर्ण करण्यात बाजी मारताच गावकऱ्यांनी घातलेला घोळ सर्वांवर पाणी फेरणारा ठरला. आता हे अस्वल पुन्हा केव्हा हाती येईल, याचा नेम नाही. हे अस्वल परिसरातील जंगलात पसार झाल्याने त्याच्याकडून आणखी शेतकऱ्यांवर हल्ला करण्याची भीती नागरिकांच्या मनात घर करून आहे. (तालुका प्रतिनिधी)
गावकरी म्हणतात; पुन्हा परतण्याच्या भीतीने केला हल्ला
अस्वलाच्या पिंजऱ्यावर गोटमार करण्यासंदर्भाम मोई व थार येथील गावकऱ्यांना विचारणा केल असता त्यांनी सदर अस्वल गावात पुन्हा परतले असते, यामुळे गोटमार केली असे सागितले. अस्वल पकडल्यानंतर त्याला मारण्याची परवानगी वनाधिकाऱ्यांना मागितली असल्याचेही गावकरी म्हणाले. त्यांनी मनाई केल्याने राग अनावर झाला आणि आम्ही गोटमार केली. यात पिंजरा तुटला. या पिंजऱ्यातून अस्वल पळून जाईल याचा अंदाज नव्हता, असे गावकरी म्हणाले.