वीज पुरवठ्यासाठी ग्रामस्थांचा रस्तारोको
By admin | Published: June 12, 2017 01:45 AM2017-06-12T01:45:10+5:302017-06-12T01:45:10+5:30
तारासावंगा येथील वीज पुरवठा एक महिन्यापासून अनियमीत होता. महावितरणला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात होते.
२३ जणांची अटक व सुटका : तारासावंगात एक महिन्यापासून ब्रेकडाऊन
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (श.) : तारासावंगा येथील वीज पुरवठा एक महिन्यापासून अनियमीत होता. महावितरणला वारंवार सांगूनही दुर्लक्ष केले जात होते. परिणामी, संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री ९ वाजता साहुर कार्यालयावर धडक दिली. अभियंता व कर्मचारी नसल्याने थेट रस्तारोको आंदोलन सुरू केले. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी आंदेलन स्थळ गाठत २३ जणांना अटक करीत सुटका केली. यामुळे तणाव निर्माण झाला होता.
तारासावंगा हे तालुक्याचे शेवटचे गाव असून २८ किमी अंतरावर आहे. गावात कुठल्याच सुविधा नाही. वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार त्यात भर घालत आहे. विद्युत तारा तुटल्या, इन्सुलेटर फुटले असून दुरुस्ती केली जात नाही. याबाबत सरपंच रत्नपाल पाटील यांनी वारंवार कार्यकारी अभियंत्यांना निवेदने दिली; पण दुर्लक्ष करण्यात आले. यामुळे ब्रेकडाऊन झाले होते. परिणामी, महावितरण लक्ष देत नसल्याचा आरोप करीत ग्रामस्थांनी सरपंच पाटील यांच्यासह साहुर येथील विद्युत कार्यालय गाठले. अभियंता हजर नसल्याने वरिष्ठांना माहिती देण्यात आली. वीज पुरवठा सुरू झाल्याशिवाय कार्यालयातून जाणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली; पण अभियंता आलेच नाही.
अखेर ग्रामस्थांनी राष्ट्रीय महामार्गावर रस्तारोको आंदोलन सुरू केले. एक तासातच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. याबाबत माहिती मिळताच पोलीस जमादार खांडरे, पिसे, बावणे, रघाटाटे आंदोलनस्थळी दाखल झाले. यावेळी २३ आंदोलकांना कलम ६८ नुसार अटक करून काही वेळाने कलम ६९ नुसार सुटका करण्यात आली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. रस्तारोको आंदोलनात सरपंच रत्नपाल पाटील, योगेश तुमडाम, सतीश निपाणी, विनोद कावळे, विलास पाटणकर, संजय सुरजूसे, विक्की कावळे, चेतन इंगळे, किरण ठोंबरे, पंकज कावळे व ग्रामस्थ सहभागी होते.