देशाची एकता व अखंडता अधिक बळकट करा
By admin | Published: July 1, 2016 02:13 AM2016-07-01T02:13:24+5:302016-07-01T02:13:24+5:30
आजपर्यंत आपल्या देशात घडून आलेल्या सामाजिक व धार्मिक समस्यांचे पडसाद शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनावर तितकेसे उमटत नाही.
अंकित गोयल : पोलीस विभागातर्फे इफ्तार पार्टीचे आयोजन
वर्धा : आजपर्यंत आपल्या देशात घडून आलेल्या सामाजिक व धार्मिक समस्यांचे पडसाद शहराच्या राजकीय व सामाजिक जीवनावर तितकेसे उमटत नाही. येथे नेहमी सलोख्याचे वातावरण पाहायला मिळते. राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या अहिंसा विचाराचा प्रभाव सर्वसामान्यांवर आहे. सर्वधर्म समभाव लोकांच्या मानसिकतेतून दिसून येते. आज देशाची एकता व अखंडता अधिक बळकट करण्याची गरज आहे, असे मत पोलीस अधीक्षक अंकीत गोयल यांनी व्यक्त केले.
माहेश्वरी भवन येथे शहर पोलीस विभागाकडून आयोजित इफ्तार पार्टी कार्यक्रमात ते बोलत होते.
सर्व धर्माच्या उत्सवांना एकजुटीने साजरे केल्यास बंधुभाव वाढून स्नेह व एकतेचा प्रसार होईल. आज समाजात विघातक प्रवृत्ती वाढत आहे. स्रेह, प्रेम, शांती, बंधुभाव, राष्ट्रीय एकात्मता धार्मिक उत्सवातुनच निर्माण होत असते, असे अंकीत गोयल पुढे म्हणाले.
शहर पोलीस विभागातर्फे आयोजित इफ्तार पार्टीत कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे, मौलाना हसीबूर रहेमान, वरिष्ठ समाजसेवक मोहन अग्रवाल, विदर्भ मुस्लीम वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष रहेमातुल्ला खान, अभ्युदय मेघे, वर्धा शहरचे ठाणेदार राजेंद्र शिरतोडे, जफर अली, ठाणेदार विजय मगर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शहर ठाणेदार शिरतोडे यांनी केले. संचालन सेक्युलर फ्रंटचे संस्थापक सदस्य इमरान राही यांनी तर आभार उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष वानखेडे यांनी मानले. कार्यक्रमाला बाळा इंगोले, लॉयन्स क्लबचे संचालक अनिल नरेडी, रमेश केला, अविनाश सातव, अॅड. शाहीद अली, अॅड. असद खान पटेल, शेख सलील, गुड्डू पठाण, देवा निखाडे, रमेश कच्छवा, गुड्डू अली, परवेज खान, हबीब खान, शेख गफ्फार, सहाय्यक पोलीस निरीक्षक निशीकांत रामटेके, युनुस खान पोलीस उपनिरीक्षक, जामा मस्जिद कमेटीचे सदस्य अताउल्लाह पठाण, प्रा. राजू गोरडे, गिरीश जोशी यासह मान्यवर उपस्थित होते.(स्थानिक प्रतिनिधी)