रोगप्रतिकारकशक्तीसाठी बलवर्धक आवळा; केस गळतीवरही आवळा गुणकारी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2024 05:29 PM2024-11-20T17:29:03+5:302024-11-20T17:29:55+5:30
Vardha : विविध प्रकारे होतो उपयोग
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : आंबट, तुरट, कडवट, अशा चवींनी युक्त असणारा बहुगुणी आवळा बाजारात दाखल झाला आहे. या फळाचे सेवन सर्व वयोगटांतील स्त्री, पुरुष करू शकतात. औषध म्हणून आवळ्याचा उपयोग बलवर्धक, केशवर्धक, धातुवर्धक, उंचीवर्धक, दृष्टी सचेत करणारे, रक्तशोधक, त्रिदोषनाशक म्हणून करतात. त्यापासून 'क' जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात मिळते. यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढते, असे तज्ज्ञ सांगतात. पचनाच्या तक्रारी दूर होतात आणि मधुमेही रुग्णांना साखरेवर नियंत्रण ठेवणे सोयीचे जाते. डोळ्यांसाठीही आवळा हितकारक आहे. मधुमेहामुळे होणाऱ्या डोळ्यांवरील परिणामांना आवळ्याच्या नियमित सेवनाने आराम मिळतो.
आवळा हा म्हातारपण दूर ढकलणारा, चेहरा तेजस्वी करणारा, वीर्यवर्धक, पचनक्रिया ठीक राखणारा, ज्वरनाशक, स्नायू तसेच दात मजबूत करणारा, रक्तशोधक, नजर तेज करणारा, केसांना काळेशार व कोमल करणारा आहे. हृदयरोग, मधुमेह, सर्दी, खोकला स्वप्नदोष, श्वेतप्रदर आदी आजारांवर गुणकारी आहे. त्यामुळे आवळ्याचे नियमित सेवन करावे, असे तज्ज्ञ सांगतात. आवळ्याच्या सेवनाने पचनशक्तीदेखील बळकट होईल. आवळा कच्चा, पावडर, लोणचे आणि रस या स्वरूपात खाता येतो.
आवळा फळ नव्हे हे तर सुपर फूड
रोज आवळा खाल्ल्याने आपला चेहरा नैसर्गिकरीत्या चमकतो. त्यात उपस्थित अँटीऑक्सिडेंट त्वचेच्या वृद्धत्वाची समस्या कमी करतात. रस पिण्यामुळे सुरकुत्या आणि फाईन लाईन कमी होतात. हे शरीराला डिटॉक्स करण्याचे कार्यदेखील करते. शिवाय हाडांसाठी आवळा रस फायदेशिर ठरतो.