हातठेला व्यावसायिकाच्या आत्महत्येने तणाव

By admin | Published: January 16, 2017 12:37 AM2017-01-16T00:37:48+5:302017-01-16T00:37:48+5:30

शहरातील पत्रावळी चौकात हातठेल्यावर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिक युवकाने शनिवारी रात्री आत्महत्या केली.

Stress by the professional suicide of the hand | हातठेला व्यावसायिकाच्या आत्महत्येने तणाव

हातठेला व्यावसायिकाच्या आत्महत्येने तणाव

Next

रुग्णालयात गर्दी : अतिक्रमण हटावच्या कारवाईवर ठपका
वर्धा : शहरातील पत्रावळी चौकात हातठेल्यावर विविध वस्तूंची विक्री करणाऱ्या व्यावसायिक युवकाने शनिवारी रात्री आत्महत्या केली. पालिकेने राबविलेल्या अतिक्रमण मोहिमेचा धसका घेऊनच सदर युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप करीत काहींनी सामान्य रुग्णालयात गर्दी केली. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता.
शेख आदील शेख जलील (२२) रा. डॉ. झाकीर हुसेन कॉलनी वर्धा, असे मृतक युवकाचे नाव आहे. शनिवारी दुपारी तो पत्रावळी चौकातून घरी गेला; पण परत आला नाही. रात्री ८.३० वाजताच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन कॉलनी परिसरातील मॉडेल हायस्कूल जवळील विहिरीत त्याने उडी घेऊन आत्महत्या केली.
तीन दिवस अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात आली. नगर पालिकेच्या पथकाने पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली. यातच शनिवारी पत्रावळी चौकात हातगाडी लावणाऱ्या एका युवकाने आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येचे कारण कळले नसले तरी घटनेला अतिक्रमण हटाव कारवाईशी जोडले जात आहे. अतिक्रमण हटाव मोहिमेचा धसका घेतल्यानेच युवकाने आत्महत्या केल्याचा आरोप अतिक्रमण धारकांनी केला.
शेख आदील कुटुंबातील एकुलता कमवता मुलगा होता. पत्रावळी चौकात हातगाडी लावून तो विविध साहित्याच्या विक्रीचा व्यवसाय करीत होता. दोन दिवसांपूर्वी न.प. मुख्य कार्यकारी अधिकारी व पथकाने बाजार ओळीमध्ये अतिक्रमण हटविण्याची कारवाई केली. ती आदीलच्या दुकानापर्यंत पोहोचली नव्हती; पण न.प. मुख्याधिकारी व पथकाने दोन दिवसांत दुकान हटविण्याच्या सूचना दिल्या होत्या. शिवाय वाहतूक पोलिसांनी दंडही केला होता. यामुळे तो हताश होता. शनिवार व रविवारी मकरसंक्रांती असल्याने त्याने विक्रीसाठी माल खरेदी केला होता. दुकान हटविले तर त्या मालाचे पैसे निघणार नाही आणि नुकसान सोसावे लागेल, अशी भीती त्याला होती. यातून नैराश्य आल्यानेच आदीलने शनिवारी रात्री आत्महत्या केल्याचा आरोप पत्रावळी चौकातील अतिक्रमण धारक व्यावसायिकांनी केला. यातूनच त्याला अतिक्रमण हटाव मोहिमेशी जोडण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
अतिक्रमणाच्या कारवाईमुळेच आदीलने आत्महत्या केल्याचा आरोप करीत अतिक्रमण धारक व नेत्यांनी रविवारी सामान्य रुग्णालयात गर्दी केली. याप्रसंगी न.प. मुख्याधिकाऱ्यांवर कार्यवाही करावी व मृतकाच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी केली. याप्रकरणी शहर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.(कार्यालय प्रतिनिधी)

मृत्यूचेही राजकारण करण्याचा प्रयत्न
शहरातील पत्रावळी चौकात हातगाडीवर विविध वस्तूंची विक्री करून उदरनिर्वाह करणाऱ्या युवकाने शनिवारी रात्री विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. या मृत्यूचेही राजकारण करण्याचा प्रयत्न शहरातील काहींनी केल्याचे दिसून आले. रुग्णालयात गर्दी करीत अतिक्रमणामुळेच आदीलने आत्महत्या केल्याचे ठासून सांगितले जात होते. यातून अतिक्रमण हटाव मोहिमेला पर्यायाने विकासाला विरोध करण्याचे कामच केले जात असल्याचे दिसून आले.

 

Web Title: Stress by the professional suicide of the hand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.