मदतीनंतर निवळला तणाव

By admin | Published: May 15, 2017 12:29 AM2017-05-15T00:29:37+5:302017-05-15T00:29:37+5:30

येथील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गिमाटेक्स कंपनीतील भगवान गायकवाड, अंबादास चिंंचोळकर आणि

Stress relief after help | मदतीनंतर निवळला तणाव

मदतीनंतर निवळला तणाव

Next

रात्रभर मृतदेह रुग्णालयात : उपजिल्हा रुग्णालयाला छावणीचे स्वरूप
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : येथील राष्ट्रीय महामार्गावर शनिवारी सायंकाळी झालेल्या अपघातात गिमाटेक्स कंपनीतील भगवान गायकवाड, अंबादास चिंंचोळकर आणि किशोर नगराळे या तीन कामगारांसह आटोचालक नवीन मून यांचा मृत्यू तर पाच प्रवासी गंभीर जखमी झाले होते. या मृतांना कंपनीकडून आर्थिक मदत देण्याच्या मागणीकरिता कामगारांनी मृत कामगारांचे शवविच्छेदन रोखून धरले होते. यावर कंपनीने या कामगारांच्या परिवाराला प्रत्येकी चार आणि आॅटोचालकाला दोन लाख रुपये मदत देण्याचे जाहीर केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत वाढलेला तणाव रविवारी दुपारी निवळला.
तोडगा निघाल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना आज आ. समीर कुणावार, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, जिल्हा पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस. यांच्या उपस्थितीत धनादेश वितरीत करण्यात करण्यात आले. याच वेळी बाजार समितीच्यावतीने प्रत्येक कुटुंबांना २५ हजार रुपयांची मदत अ‍ॅड. कोठारी यांनी जाहीर केली.
कंपनीने प्रारंभी मदत नाकारल्याने संतप्त कामगारांनी कामबंद आंदोलन करून रात्री १२ वाजता अखेरची पाळी बंद केली. मृतक कामगार कुटुंबियांना गिमाटेक्स व्यवस्थापनाकडून जोपर्यंत आर्थिक मदत दिली जात नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी ठाम भूमिका कामगारांनी घेतली. यामुळे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनाकरिता आणलेले मृतदेह ताब्यात घेण्यास मृतकांच्या कुटुंबियांनी व कामगारांनी नकार दिला. त्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. परिणामी, रुग्णालयात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
यावर तोडगा काढण्यासाठी शनिवारी रात्री उशिरापर्यंत उपविभागीय अधिकारी स्मिता पाटील यांच्या कार्यालयात बैठक सुरू होती. यावेळी आ. समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, कामगार नेते आफताफ खान तसेच गिमाटेक्सच्यावतीने व्यवस्थापक शाकीर खान पठाण उपस्थित होते. चर्चेअंती गिमाटेक्स व्यवस्थापनाने मृतकांच्या कुटुंंबियांना २.५० लाखांची मदत कबुल केली; पण कामगार प्रतिनिधींनी मृतकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी १२ लाख देण्यात यावे, अशी मागणी केली. यामुळे रात्री तोडगा मिळू शकला नाही.
या विषयावर आज पुन्हा सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकारी कार्यालयात चर्चा झाली. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक निर्मलादेवी एस., सहायक पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, उपविभागीय पोलीस अधिकारी पडोळे स्वत: उपस्थित झाले. तसेच आ. समीर कुणावार, माजी आमदार राजू तिमांडे, बाजार समितीचे सभापती अ‍ॅड. सुधीर कोठारी, कामगार नेते आफताफ खान, माजी जि.प. सदस्य मधुसूदन हरणे तर व्यवस्थापकाकडून शाकीर खान पठाण, ओम जोशी, बबला कोयर, विनोद जैस्वाल उपस्थित होते. यावेळी मृतक कामगार कुटुंबियांच्या सदस्यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. चर्चेअंती तोडगा निघाल्याने मृतदेह त्यांच्या कुटुंबियांनी ताब्यात घेवून अंत्यसंस्कार पार पाडले. तसेच कामगारांनी आज दुसऱ्या पाळीपासून ३ वाजता काम सुरू केले. चर्चेच्या वेळी माजी नगरसेवक अनिल भोंगाडे, न.प. पाणीपुरवठा सभापती अंकुश ठाकुर, माजी पं.स. सदस्य वामन चंदनखेडे, शिवसेनेचे शहर प्रमुख मुन्ना त्रिवेदी तसेच कामगार प्रतिनिधी, मृतक कुटुंबियांचे नातेवाईक आदी उपस्थित होते.

आमदारांच्या हस्ते धनादेश वितरित
मृत कामगार कुटुंबीयांना प्रत्येकी चार व मृतक आटोचालक मून यांच्या कुटुंबियांना दोन लाखांच्या मदतीचे धनादेश मृताच्या कुटुंबियांना आ. समीर कुणावार यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी आ. कुणावार यांनी वैयक्तिक २५ हजार रुपये रोख मृतकांच्या कुटुंबियांना दिले. या व्यतिरिक्त मुख्यमंत्री सहायता निधींतर्गत मृतकाच्या कुटुंबियांना १ लाख रुपये सहाय्य मिळवून देण्याचे आ. कुणावार यांनी जाहीर केले.
मृत कामगार कुटुंबियांना प्रॉव्हिडंट फंड ईन्शुरन्स अंतर्गत किमान चार ते साडे चार लाख रुपये, ग्रॅज्युटी रक्कम तसेच गिमाटेक्स कर्मचाऱ्यांच्यावतीने एक दिवसाचा पगार मिळणार असल्याचे व्यवस्थापक पठाण यांनी सांगितले. मृतक कामगार कुटुंबियांना प्रत्येकी एकूण ११ ते १२ लाख रुपये मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

 

Web Title: Stress relief after help

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.