आरंभा गावात तणावपूर्ण शांतता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:27 PM2018-07-22T23:27:33+5:302018-07-22T23:29:45+5:30

सालगड्यासोबत झालेल्या भांडणादरम्यान मध्यस्थी करण्यात आली. त्याचा वचपा काढण्यासाठी काही तरुणांनी थेट शेतकऱ्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. यात आरंभा येथील शेतकरी समीर देवतळे याचा मृत्यू झाला.

Stressful silence in Arambha village | आरंभा गावात तणावपूर्ण शांतता

आरंभा गावात तणावपूर्ण शांतता

googlenewsNext
ठळक मुद्देझोपड्या जाळण्याचा प्रयत्न : गावाला पोलीस छावणीचे स्वरूप

लोकमत न्यूज नेटवर्क
समुद्रपूर : सालगड्यासोबत झालेल्या भांडणादरम्यान मध्यस्थी करण्यात आली. त्याचा वचपा काढण्यासाठी काही तरुणांनी थेट शेतकऱ्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. यात आरंभा येथील शेतकरी समीर देवतळे याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली असून घटनेच्या दुसऱ्या दिवशी रविवारी संतप्त जमावाने मारेकरी असलेल्या तरुणांच्या झोपड्या जाळण्याचा प्रयत्न केला; पण वेळीच पोलिसांनी मध्यस्थी केल्याने पुढील अनर्थ टळला. सदर प्रकारामुळे आरंभा येथे तनावपूर्ण शांतता असली तरी तगड्या बंदोबस्तामुळे या गावाला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
प्राप्त माहितीनुसार, तालुक्यातील आरंभा येथे शनिवारी काही पारधी समाजाच्या युवकांनी तेथीलच शेतकरी समीर देवतळे याच्यावर चाकू हल्ला करून त्याची हत्या केली. सदर घटनेमुळे परिसरात कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला. पोलिसांनी सदर प्रकरणी आरोपींविरुद्ध मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होऊन चोवीस तासांचा कालावधी लोटूनही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले नाही. सदर घटना शनिवारी दुपारी घडल्यानंतर आज मृतक समीरवर अंत्यसंस्काराची विधी होत असता संतप्त जमावाने अंत्ययात्रा थेट आरोपींच्या घराच्या दिशेने नेत त्यांच्या झोपड्या पेटविण्याचा प्रयत्न केला. मृतक समीरवर होणाऱ्या अंत्यसंस्कारादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणनू पूर्वीच पोलीस गावात दाखल झाले होते. दरम्यान सदर परिस्थिती निदर्शनास आल्याने पोलिसांनी मध्यस्ती केली. यावेळी सकारात्मक चर्चेअंती संतप्त जमावाने माघार घेतली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याप्रसंगी संतप्त जमावाने समीरचे मारेकरी असलेल्या आरोपींच्या झोपड्या तातडीने हटविण्याची मागणी रेटून लावली होती. पोलिसांच्या मध्यस्तीअंती परिस्थिवर नियंत्रण मिळविण्यात आले.
गटविकास अधिकाऱ्यांना संतप्त जमावाचे साकडे
समीरच्या हत्येमुळे गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून झोपड्या बांधून राहणाऱ्या समीरच्या आरोपींमुळे गावातील नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. तेथे अतिक्रमण करून राहणाऱ्यांपैकी बहूतांश जण गावठी दारू गाळून त्याची विक्री करतात. त्यामुळे सदर झोपड्या तात्काळ तेथून हटविण्यात याव्या, अशी मागणी यावेळी संतप्त ग्रामस्थांनी केली. शिवाय त्या मागणीचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
समीरचा एक मारेकरी पोलिसांना गवसला
शेतकरी समीर देवतळे हत्या प्रकरणातील एका अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली असून अन्य आरोपींना जेरबंद करण्यासाठी समुद्रपूर पोलीस प्रयत्न करीत आहेत. या प्रकरणाचा प्राथमिक तपास ठाणेदार प्रविण मुंडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक मिलिंद पारडकर करीत आहे.
पार पडली ग्रा.पं.मध्ये शांतता सभा
वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या झोपड्यांमध्ये गावठी दारू गाळून त्याची विक्री केली जात असल्याचे वास्तव आहे. तसे पोलिसांच्या कारवाईतही पुढे आले आहे. त्याच झोपड्यांमध्ये राहणाऱ्या तिघांनी शेतकरी समीरची हत्या केली असून या झोपड्या त्वरित हटविण्यात याव्या, अशी मागणी संतप्त ग्रामस्थांनी केली. गावात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी या हेतूने पोलिसांच्या मध्यस्तीने आरंभा ग्रा.पं. कार्यालयात शांतता सभा पार पडली. याप्रसंगी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनाद होता. या बैठकीला उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव तेळे, ठाणेदार प्रविण मुंडे, सरपंच दुर्गा कुंभारे, उपरपंच कैलास लढी, ग्रा.पं. सदस्य अलका कुबडे, देवका भटे, प्रमोद भटे, तारा वानखेडे, बाबा झाडे, शंकर हरडे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
झोपड्या हटविण्याच्या मुद्यावर चर्चा
ग्रा.पं. कार्यालयात पार पडलेल्या सभेत वनविभागाच्या जागेवर अतिक्रमण करून बांधण्यात आलेल्या झोपड्या हटविण्याचा मुद्दा चर्चीला गेला. झोपड्या हटवायच्या असेल तर त्या कायदेशीर पद्धतीने हटवा, कुणीही कायदा हातात घेवू नका, असे यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी झोपड्या हटविण्याची मागणी करणाऱ्यांना समजावून सागितले.
दंगल नियंत्रण पथकाला केले पाचारण
आरंभा गावातील तणावाच्या परिस्थती दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून तेथे हिंगणघाट, गिरड, समुद्रपूर, वडनेर या पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह वर्धेच्या पोलीस अधीक्षक कार्यालयातून दंगल नियंत्रण पथकाच्या जवानांना पाचारण करण्यात आले होते. उपविभागीय पोलीस अधिकारी भीमराव टेळे यांच्यासह समुद्रपूरचे ठाणेदार प्रविण मुंडे, गिरडचे ठाणेदार महेंद्रसिंग ठाकूर, वडनेरचे ठाणेदार आशीष गजभिये, पोलीस उपनिरीक्षक अमोल कोल्हे, पोलीस उपनिरिक्षक मिलिंद पारडकर, अजय घुसे, माधुरी गायकवाड, अशोक चहांदे, अमोल खांडे, मनोहर मुडे, यशवंत गोल्हर, सचिन रोकडे, स्वप्नील वाटकर आदी पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी गावात दिवसभर ठाण मांडून होते.

Web Title: Stressful silence in Arambha village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.