आक्षेपार्ह पोस्टमुळे आंजीत तणावपूर्ण शांतता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2019 10:01 PM2019-08-21T22:01:52+5:302019-08-21T22:03:18+5:30
येथील डॉ. रविदत्त कांबळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून बुधवारी परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आंजी (मोठी) : येथील डॉ. रविदत्त कांबळे यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे धार्मिक भावना दुखावल्याने त्यांच्या दवाखान्याची तोडफोड केली. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली असून बुधवारी परिसरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. याच्या निषेधार्थ बाजारपेठ बंद ठेवून खरांगणा (मोरांगणा) पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. पोलिसांनी डॉ. कांबळे यांना ताब्यात घेतले असून सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
येथील डॉ. रविदत्त कांबळे यांनी मंगळवारी फेबसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने आंजीसह परिसरातील नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावल्या. त्यामुळे रात्रीच काहींनी आंजी येथील त्यांच्या दवाखान्याची तसेच येळाकेळीजवळ वाहनाचीही तोडफोड केली. याप्रकरणी गुरुवारी सकाळी सर्व दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. रामजन्म उत्सव समितीचे मनोजकुमार गुप्ता यांच्यासह सहकाऱ्यांनी खरांगणा पोलीस स्टेशनमध्ये डॉ. कांबळे यांच्याविरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून डॉ. कांबळे यांना ताब्यात घेतले. पुढील तपास ठाणेदार गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक शहा व पोलीस चौकीचे प्रभारी संतोष कामडी करीत आहे. आंजीत सकाळी निषेध सभेचे आयोजन करण्यात आल्याने तणावाची स्थिती कायम होती. या सभेत सरपंच जगदीश संचेरिया, भाजपाचे महामंत्री सुनील गफाट, सुनील भांदक्कर, सतिश पवार, अमोल भिवगडे व रामंचद्र बालपांडे आदी उपस्थित होते. यावेळी पुलगावचे पोलीस उपविभागीय अधिकारी जाधव यांनीही भेट देऊन परिस्थिती जाणून घेतली.