जिल्ह्यात कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 05:00 AM2021-02-17T05:00:00+5:302021-02-17T05:01:02+5:30

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधून रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील काही भागात रुग्णसंख्येत वाढ होत असून यात विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. 

Strictly enforce corona rules in the district | जिल्ह्यात कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करा

जिल्ह्यात कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करा

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश : जिल्ह्याचा पॅाझिटिव्ह रेट १५.६३ टक्के

लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा :  राज्यातील २१ जिल्ह्यामध्ये गेल्या आठवड्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. विदर्भातील अमरावती, वर्धा, अकोला, बुलढाणा, यवतमाळ आणि नागपूर या जिल्ह्यांच्या रुग्णसंख्येतील वाढ ही चार टक्केपेक्षा जास्त आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आणि वारंवार हात धुणे या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देश सर्व जिल्हाधिकारी यांना दिलेत. या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यात कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्यासोबतच लोकांमध्ये कोरोनाबाबत काळजी घेण्यासाठी जनजागृती करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी यंत्रणेला दिलेत.
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मंगळवारी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी दूरस्थ प्रणालीद्वारे संवाद साधून रुग्ण संख्येत वाढ होत असलेल्या जिल्ह्यांचा आढावा घेतला. ९ ते १५ फेब्रुवारी दरम्यान राज्यातील काही भागात रुग्णसंख्येत वाढ होत असून यात विदर्भातील सात जिल्ह्यांचा समावेश आहे. 
यात वर्धा जिल्हाही एक असून जिल्ह्याचा पहिल्यांदाच पॉझिटिव्ह रेट १५.६३ टक्के आढळून आला आहे. या मागच्या कारणांचा शोध घ्यावा, त्यासाठी तात्काळ उपाययोजना राबवाव्या, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. यासंदर्भात जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तात्काळ सबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावून अधिकाऱ्यांना निर्देश दिलेत. 
यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अजय डवले, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सावंगी रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे उपस्थित होते.
 

विवाह सोहळ्याच्या आनंदावर पुन्हा विरजण?
कारोनाचा पॉझिटिव्ह रेट बघता विवाह समारंभ, मेळावे, मोर्चे, सार्वजनिक कार्यक्रम या ठिकाणी ५० लोकांपेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्याची मंजुरी देऊ नयेत. रेस्टॉरंट तसेच गर्दीच्या ठिकाणी संख्येच्या मर्यादेबाबत घालून दिलेल्या बंधनाचे काटेकोरपणे पालन करावे. गर्दीच्या ठिकाणी सामाजिक अंतर, मास्कचा वापर बंधनकारक करावा तसेच हातांची स्वछता राखली जाईल याची काळजी घ्यावी. शहरात गर्दीच्या ठिकाणी फवारणी आणि हॅन्ड वॉश सेंटर पुन्हा सुरू करावेत, असे आदेश दिलेत. त्यामुळे आता विवाह सोहळ्यासह इतर कार्यक्रमांच्या उत्साहावर विरजण पडण्याची शक्यता आहे.

चाचणींची संख्या वाढवावी
सर्व खाजगी डॉक्टरांनी ताप, खोकला व कोरोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांना तातडीने कोरोना चाचणी करण्यास सांगणे बंधनकारक करावे. चाचण्यांची संख्या वाढवावी तसेच अति जोखमीचे रुग्ण आणि ज्येष्ठ नागरिक यांचे सर्वेक्षण सुरू करावे. मोबाईल टेस्टिंग व्हॅन ग्रामीण भागात सुरू करावी जेणेकरून रुग्णांची चाचणी लवकर होऊन त्यांना तातडीने उपचार घेता येतील, असेही जिल्हाधिकारी यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. 

 

Web Title: Strictly enforce corona rules in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.