कुपोषणमुक्तीसह मागण्यांसाठी धडक
By admin | Published: May 28, 2017 12:32 AM2017-05-28T00:32:38+5:302017-05-28T00:32:38+5:30
कुपोषण मुक्तीसाठी त्वरित उपाययोजना अंमलात आणावी यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ प्रदेश विकास परिषदेने
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कुपोषण मुक्तीसाठी त्वरित उपाययोजना अंमलात आणावी यासह विविध मागण्यांसाठी विदर्भ प्रदेश विकास परिषदेने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
सन २०१६ मध्ये राज्यात १७ हजार जणांचा कुपोषणामुळे मृत्यू झाला. यात बालक व महिलांचा समावेश होता. कुपोषणाने मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण विदर्भात आहे. एकट्या मेळघाट परिसरातील धारणी व चिखलदरा तालुक्यात एक वर्षात ८०० च्या वर बालकांचा मृत्यू झाला. अमरावती, यवतमाळ, गडचिरोली व गोंदिया या ४ जिल्ह्यातील आदिवासी भाग मोठ्या प्रमाणात कुपोषित आहे. नुकत्याच एका सर्व्हेत नागपूर शहरात विविध वस्त्यांमधून ५ हजार मुले कुपोषित असल्याचे आढळले. उच्च न्यायालयाने याबाबत उपाययोजना आखण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते; पण अद्यापही उपाययोजना केल्या नाही. यामुळे विदर्भच नव्हे तर राज्य कुपोषणमुक्त होण्यासाठी त्वरित उपाययोजना अंमलात आणाव्या. सर्व शासकीय यंत्रणा कार्यान्वित कराव्या, अंगणवाडीच्या माध्यमातून प्रत्येक आरोग्य केंद्रावर गरोदर माता व कुपोषित बालकांना नियमित औषध द्यावे, तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती करावी आदी मागण्या करण्यात आल्या. निवेदन देताना विदर्भ विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष विलास कांबळे, सचिव मंगेश चोरे व पदाधिकारी उपस्थित होते.