बोर व्याघ्र परिसरातून पट्टेदार वाघांची पळवापळवी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 02:18 PM2019-12-11T14:18:25+5:302019-12-11T14:18:47+5:30

देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या बोर व्याघ्र परिसरातून सध्या वाघाची पळवापळवी होत असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून उजेडात आला आहे.

The striped tiger run away from the bore tiger area? | बोर व्याघ्र परिसरातून पट्टेदार वाघांची पळवापळवी?

बोर व्याघ्र परिसरातून पट्टेदार वाघांची पळवापळवी?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
महेश सायखेडे
वर्धा: देशातील सर्वात छोटा व्याघ्र प्रकल्प अशी ओळख असलेल्या बोर व्याघ्र परिसरातून सध्या वाघाची पळवापळवी होत असल्याचा धक्कादायक प्रकार माहितीच्या अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून उजेडात आला आहे. २०१८-१९ या वर्षात बोर व्याघ्र प्रकल्पात चार वाघिणी, एक वाघ असे एकूण पाच मोठे तर ३ छोट्या वाघांचे वास्तव्य असल्याची नोंद घेण्यात आली आहे. मागील पाच वर्षांमधील नोंद घेतलेल्या वाघांच्या संख्येच्या आकडेवारीवर लक्ष टाकले असता वाघांच्या संख्येत कमालीची तफावत येत असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पातून पट्टेदार वाघांची पळवापळवी तर होत नाही ना, असा प्रश्न वन्यजीवप्रेमींकडून उपस्थित केला जात आहे.
बोर अभयारण्य परिसरात मोठ्या संख्येने वाघांचे वास्तव्य असल्याने आणि तेथील वातावरण वाघांसाठी पोषक असल्याने त्या भागाला २०१४ मध्ये व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा मिळाला. अत्याधुनिक यंत्राचा वापर करून झालेल्या व्याघ्र गणनेनुसार २०१४ मध्ये या परिसरात दोन वाघिणी तर दोन मोठे वाघ तसेच वाघांचे दोन बछड्यांचे वास्तव्य होते. त्यावेळी मोठ्या वाघांना बीटीआर-१, बीटीआर-२, बीटीआर-३ व बीटीआर-४ अशी नावे देण्यात आली होती. परंतु, मागील काही वर्षांपासून बीटीआर-४ शिवाजी नामक वाघ बेपत्ता असून त्याचा शोध घेण्याकडे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत आहे. तर बीटीआर-२ बाजीराव नामक वाघाचा रस्ता अपघातात मृत्यू झाला आहे. २०१४-१५ मध्ये दोन वाघिण तर एक वाघ आणि वाघाचे सात बछडे, २०१५-१६ मध्ये दोन वाघिण एक वाघ आणि वाघाचे चार बछडे, २०१७-१८ मध्ये तीन वाघिण तीन वाघ तर वाघाचे सहा बछडे, शिवाय २०१८-१९ मध्ये चार वाघिण तर एक वाघ आणि वाघाच्या तीन बछड्यांचे वास्तव्य बोर व्याघ्र प्रकल्पात असल्याची नोंद अत्याधुनिक यंत्रांच्या सहाय्याने करण्यात आलेल्या व्याघ्र गणनेदरम्यान घेण्यात आली आहे. असे असले तरी बोर व्याघ्र प्रकल्पातून प्रत्येक वर्षी वाघांची संख्या घटत असल्याचे सदर शासकीय आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे येथील पट्टेदार वाघ गेले कुठे तसेच त्यांची संगणमत करून शिकार तर केली गेली नाही ना याचा शोध घेण्यासाठी उच्चस्तरीय चौकशीची मागणी वन्यप्रेमींकडून केली जात आहे.

शिवाजीची नियोजनबद्ध शिकार?
२०१२ मध्ये गरमसुर परिसरात शिवाजी नामक वाघाचे दर्शन काहींना झाले होते. परंतु, त्यानंतर तो बोर व्याघ्र प्रकल्पातून बेपत्ता आहे. या वाघाची शिकार झाल्याची चर्चा सध्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांमध्ये रंगत असल्याने सदर प्रकरणातील वास्तव समोर आणण्यासाठी वरिष्ठ अधिकाºयांनी विशेष मोहीम हाती घेण्याची गरज आहे.

खात्रीदायक माहितीवर गोपनीयतेचे पांघरूण
माहिती अधिकाराचा वापर करून बेपत्ता असलेल्या शिवाजी नामक वाघाची तसेच बोर व्याघ्र प्रकल्पात सध्यास्थितीत किती वाघांचे वास्तव्य आहे याची माहिती जाणून घेतली असता खात्रीदायक माहितीवर अधिकाºयांकडून गोपनीयतेचे पांघरूण टाकले जात आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्याकडून गोपनीयतेचे पांघरून टाकून माहितीच देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

माहिती अधिकाराचा वापर करून माहिती मागितली असता अर्धवट माहिती देण्यात आली. इतकेच नव्हे तर खात्रीदायक माहिती गोपनीयतेचे कारण पुढे करून देण्याचे टाळण्यात आले. यासंदर्भात आपण वरिष्ठांकडे अपील दाखल करणार आहोत. वर्षनिहाय घेण्यात आलेल्या वाघांच्या नोंदीत कमालीची तफावत दिसते. त्यामुळे उच्चस्तरीय चौकशीची गरज आहे.
- ताराचंद चौबे, जेष्ठ आरटीआय कार्यकर्ता, वर्धा.

Web Title: The striped tiger run away from the bore tiger area?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tigerवाघ