एसटीच्या स्वेच्छानिवृत्ती योजनेला मिळतोय अत्यल्प प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 05:00 AM2021-01-02T05:00:00+5:302021-01-02T05:00:17+5:30
आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे; तर १ जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत नव्याने समावेश होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार केला जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्य परिवहन महामंडळाकडून ५० वर्षांवरील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी राबविल्या जाणाऱ्या स्वेच्छानिवृत्तीसाठी आतापावेतो केवळ चारच अर्ज प्राप्त झाले आहेत. राज्यातील २७ हजार कर्मचारी या योजनेसाठी पात्र ठरतील, असा अंदाज एस.टी. महामंडळाने व्यक्त केला होता. त्यासाठी २४ डिसेंबर ही अंतिम मुदतही ठेवली होती. मात्र, अत्यल्प अर्ज प्राप्त झाल्याने अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात येणार असल्याचे समजते.
आधीच तोट्यात असलेल्या एस.टी. महामंडळाचे वाहतूक उत्पन्न कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात बुडाले. त्यामुळे वेतनावरील खर्च कमी व्हावा आणि आर्थिक अडचणीतून बाहेर पडावे म्हणून महामंडळाने अधिकारी, कर्मचाऱ्यांकरिता स्वेच्छानिवृत्ती योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० जून २०२० रोजी वयाची ५० वर्षे पूर्ण करणाऱ्यांसाठी ही योजना लागू राहणार आहे; तर १ जुलै २०२० ते १ डिसेंबर २०२० पर्यंत नव्याने समावेश होणाऱ्या कर्मचाऱ्यांबाबतही विचार केला जाणार आहे. वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत), हिंगणघाट, आदी पाच आगारे आहेत. या संपूर्ण आगारांत २४० बसगाड्या आहेत; तर १५००च्या जवळपास अधिकारी, कर्मचारी आणि कामगार आहेत.
अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतनावर महिन्याकाठी २.२५ ते अडीच कोटी इतका खर्च होतो. राज्यातील २७ हजार कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी पुढाकार घेतला तर वेतनासाठीचे दरमहा १०३ कोटी रुपये वाचणार आहेत. स्वेच्छानिवृत्तीसाठी इच्छुक कर्मचाऱ्यांकडून संमतीपत्र, वैयक्तिक माहितीपत्र मागविण्यात आले होते. मात्र, वर्धा विभागांतर्गतच्या पाचही आगारांतून केवळ चारच अर्ज प्राप्त झाल्याची माहिती विभाग नियंत्रक चेतन हसबनीस यांनी दिली.
वर्धा विभागांतर्गत पाच आगार असून १५०० कर्मचारी कार्यरत आहेत. या सर्व कर्मचार्यांच्या वेतनावर महिन्याकाठी २.२५ कोटी रुपये खर्च होतात.
अर्ज सादर करण्यास मिळणार मुदतवाढ
या येजनेसाठी निवृत्ती घेणार्या कर्मचार्यांची माहिती उपलब्ध होत नाही तोपर्यंत नेमक्या निधीची मागणी करता येत नाही. महामंडळाने कर्मचार्यांची माहिती गोळा करण्यास सुरूवात केली असून अर्ज सादरीकरणाला मुदतवाढ मिळणार असल्याचे समजते.