आई रागावली म्हणून विद्यार्थ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 10:14 PM2019-05-16T22:14:33+5:302019-05-16T22:14:56+5:30
आईने रागविले म्हणून अमरावती येथे अभियांत्रिकीच्या सिव्हिल शाखेत अंतिम वर्षाला असलेल्या आष्टी येथील युवकाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. बुधवारी, १५ ला रात्री ११ वाजता ही घटना घडली. प्रसादराजकुमार गंजीवाले (२२) असे मृत युवकाचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : आईने रागविले म्हणून अमरावती येथे अभियांत्रिकीच्या सिव्हिल शाखेत अंतिम वर्षाला असलेल्या आष्टी येथील युवकाने रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या केली. बुधवारी, १५ ला रात्री ११ वाजता ही घटना घडली.
प्रसादराजकुमार गंजीवाले (२२) असे मृत युवकाचे नाव आहे.
मृत प्रसाद हा अत्यंत हुशार व मनमिळावू, प्रेमळ स्वभावाचा होता. आठ वर्षांपूर्वी वडिलांचा मृत्यू झाला. बहिणीचे लग्न झाले. त्याची आई व तो दोघेच आष्टीला राहात होते. बारावीनंतर त्याने अमरावतीला रायसोनी अभियांत्रिकीत स्थापत्य शाखेत प्रवेश घेतला. काही विषयात तो नापास झाला होता. त्यामुळे अंतिम वर्षात शिक्षण घेताना जुने विषय पूर्ण करून त्याला गुणपत्रिका प्राप्त करून घ्यायची होती. मात्र, त्याच्या आईने तू गुणपत्रिका घेऊनच घरी ये, असे म्हणत बुधवारी सकाळी रागावले. त्याने राग मनावर घेऊन कपडे, कागदपत्र व इतर साहित्य घेत बॅग भरली. सकाळी १० वाजता घराबाहेर पडला.
दिवसभर मित्रांसोबत त्याने वेळ खर्च केला. सर्वांना भेटून विचारपूस केली. होळीचे फोटो शेअर केले. सायंकाळी अमरावतीला जायचे असून दुसऱ्या दिवशी कॉलेज आहे, असे सांगितले. त्याचा मित्र अक्षय केचे, हर्षल नेवारे यांनी त्याला तळेगावला सोडून दिले. नंतर बसने अमरावती गेला. रात्री १०.३० वाजता मित्रांना मेसेज केला, सर्वांना धन्यवाद मानले. इकडे आई रडत होती. आईने मित्राला फोन करून प्रसादला मी रागावले, त्याला समजवा असे सांगितले. त्यानंतर त्याच्या मित्राने आईचा निरोप दिला. मात्र, राग अनावर झाल्याने त्याने थेट बडनेरा रेल्वे स्थानक गाठले. रेल्वेस्थानकावर वर्धा मार्गाच्या क्रॉस रूळावर तो झोपला. रेल्वे आली आणि क्षणार्धात प्रसादने जगाचा निरोप घेतला. सकाळी रेल्वे लाईनजवळ नागरिकांनी एकच गर्दी केली. प्रसादचे कागदपत्र पाहताच तो आष्टीचा असल्याचे दिसून आले. घटनेची माहिती माजी सरपंच काशीनाथ कालोकर यांना दिली. त्यांनी प्रसादच्या आई व मित्रांना सांगितले. आष्टीत माहिती होताच वातावरण सुन्न झाले.