ममदापूर प्राथमिक शाळेतील शिक्षिकेद्वारे विद्यार्थ्यांचा छळ
By admin | Published: April 5, 2015 02:05 AM2015-04-05T02:05:40+5:302015-04-05T02:05:40+5:30
जि़प़ प्राथमिक शाळा ममदापूर येथील सहशिक्षिकेच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
आष्टी (शहीद) : जि़प़ प्राथमिक शाळा ममदापूर येथील सहशिक्षिकेच्या दुर्लक्षित व निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर शिक्षिका सतत विद्यार्थ्यांचा छळ करीत असल्याचा आरोप होत आहे़ नुकतेच एका अपघातातून विद्यार्थी थोडक्यात बचावले़ या प्रकरणांची सखोल चौकशी करून त्वरित कारवाई करावी, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीसह ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे़
निवेदनातील माहितीनुसार, सदर शिक्षिका शिष्यवृत्ती परीक्षेकरिता २२ मार्च रोजी विद्यार्थ्यांना तळेगाव येथे घेऊन गेल्या होत्या़ परीक्षा संपल्यावर विद्यार्थ्यांना अनोळखी इसमाच्या आॅटोमध्ये बसवून दिले. ममदापूर बसस्थानकावरून घरी जाताना आर्वी-वरूड बसने मयूर खरे व पूजा परतेती या विद्यार्थिनी एसटी बस चालकाच्या चौकस बुद्धीमुळे अपघातातून बचावल्या.
सदर शिक्षिकेने विद्यार्थ्यांना शाळेतून सोबत नेले व सोडून देताना परस्पर सोडले़ हा प्रकार विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतणारा होता. बेजबाबदार, निष्काळजी व विद्यार्थ्यांप्रती दुर्लक्षित असलेल्या सदर शिक्षिकेवर कठोर कारवाई करून इतरत्र बदली करावी, अशी मागणी ग्रामपंचायतमध्ये झालेल्या सभेत करण्यात आली. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गौतम खरे याबाबत लेखी तक्रार केली आहे़(प्रतिनिधी)