प्रवाहित विद्युत तारांच्या स्पर्शाने विद्यार्थी गतप्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 11:05 PM2018-06-09T23:05:11+5:302018-06-09T23:05:25+5:30
विद्युत खांबात वीज प्रवाहित झाली. याच खांबाला लागून असलेल्या प्रवाहित विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील गिरोली (ढगे) येथे घडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
आकोली/झडशी : विद्युत खांबात वीज प्रवाहित झाली. याच खांबाला लागून असलेल्या प्रवाहित विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने १६ वर्षीय बालकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास सेलू तालुक्यातील गिरोली (ढगे) येथे घडली. शिवाय याच खांबाला स्पर्श झाल्याने एका शेळीचाही मृत्यू झाला. आदित्य अनिल ढगे रा. गिरोली (ढगे) असे मृतकाचे नाव आहे. शुक्रवारी नुकताच त्याचा दहाव्या वर्गाचा निकाल लागला. यात तो प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाला होता.
आदित्य ढगे हा घटनेच्या दिवशी चंदू सुटे यांच्या शेतात रोजंदारीने कपाशीची लागवड करण्यासाठी गेला होता. सर्व मजूर वेळीच पोहोचले. पण आपल्याला येण्यास उशीर झाल्याचे लक्षात येताच तो घाई गडबडीने सुटे यांच्या शेतात जात होता. दरम्यान धुऱ्यावर असलेल्या विद्युत प्रवाहीत तारांला त्याचा स्पर्श झाला. सदर प्रकार इतर शेतमजुरांच्या लक्षात येताच त्याला परिसरातील नागरिकांच्या मदतीने तातडीने वर्धेच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याच घटनेदरम्यान ज्या विद्युत खांबात विद्युत प्रवाहित झाली व त्याला गुंडाळून असलेल्या ताराचा स्पर्श आदित्यला झाला त्याच ताराच्या स्पर्शाने एका शेळीचाही मृत्यू झाल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. शेळी दगावल्याने क्षीरसमुद्र येथील शेळीपालक गणेश मुंगले यांचे सुमारे ५ हजारांचे नुकसान झाले आहे. आदित्यच्या मृत्यूसह शेळीपालक मुंगले यांच्या नुकसानीला महावितरणच्या अधिकाºयांचे दुर्लक्षीत धोरण जबाबदार असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला असून मृतकाच्या कुटुंबियांना व शेळीपालकाला महावितरणने आर्थिक मदत करावी, अशी मागणी आहे. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.