प्लास्टिक निर्मूलनासाठी विद्यार्थीही सरसावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 10:18 PM2019-04-24T22:18:19+5:302019-04-24T22:18:47+5:30
स्थानिक गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : स्थानिक गो.से.वाणिज्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाद्वारे प्लास्टिक निर्मूलन जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध भागात जाऊन नागरिकांशी संवाद साधला.
प्लास्टिक वापराचे दुषपरिणाम, त्याचा पर्यावरण तसेच मानवी जीवनावर होणारा विपरीत परिणाम, याबाबत लोकांमध्ये जागृती घडवून आणावी. जिल्ह्यातून प्लास्टिकचा वापर शक्य तेवढा कमी करुन पर्यावरणस्रेही वातावरण निर्मितीबाबत लोकांचा कल वाढावा, या उद्देशाने जनजागृती अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अब्दुल बारी यांच्या मार्गदर्शनात आयोजित या जागृती अभियानात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून वर्धा शहराच्या विविध भागात जावून जागृतीचा प्रयत्न केला. प्लास्टिक समूळ निर्मूलन अशक्य आहे. अन्नपदार्थ तसेच इतर साहित्यासाठी आपण प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर करीत असतो. मात्र ते नष्ट करता येत नसल्याने पर्यावरणावर त्याचा विपरीत परिणाम होतो.
तसेच जाळण्याचा प्रयत्न केल्यास प्रदुषण वाढते. त्यामुळे नागरिकांनी प्लास्टिकच्या जागी कागदी अथवा कापडाच्या पिशव्यांचा वापर केल्यास पर्यावरण सुरक्षित राहील तसेच प्रदुषणास देखील आळा बसेल. याबाबत विद्यार्थ्यांनी माहिती दिली. या अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वत: तयार केलेल्या कागदी लिफाफे, पॉकेटस वर्धेतील शासकीय तसेच गैरशासकीय औषध वितरण केंद्रांत व अन्य दुकानदारांना वितरीत करुन त्यांना प्लास्टिक पिशव्यामध्ये वस्तू न देता कागदी पिशव्यांचाच वापर करावा, असा संदेश दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या या उपक्रमात दुकानदारांनी सहभागी होऊन त्यांना प्रतिसाद देत सहकार्यही केले.
विद्यार्थ्यांनी हाच संदेश नागरिकांनाही दिल्याने नागरिकांनीही त्यांच्या या उपक्रमाचे स्वागत केले. वर्धेतील दुकानदारांसह सर्वसामान्य लोकांनी सुद्धा पर्यावरणपूरक कागदी अथवा कापडाच्या पिशव्या वापरण्याबाबत विश्वास व्यक्त केला. या जनजागृती अभियानाच्या आयोजनाकरिता रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. मिलींद शेंडे, प्रा. अल्पना वनमाली, डॉ. एस.आर. जूनघरे, डॉ. मंगला तोमर, प्रा. मधुरिमा नायडू, प्रा. शैलेश जनबंधु यांच्यासह रजत शेंडे, प्रमोद पाटील, मानसी यादव, राधा यादव, अनिकेत क्षिरसागर, प्रवीण देबे, सुबोध वाघ आदींनी सहकार्य केले.