पशुसंवर्धन विभागातील पदोन्नतीच्या राजकारणात विद्यार्थी ठरताहेत कुबड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 01:29 PM2019-04-17T13:29:13+5:302019-04-17T13:31:25+5:30
राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने नुकताच पशुधन विकास अधिकारी गट ब या पदाच्या १२५ जागांकरिता पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहे. या पदावर पदविकाधारक विद्यार्थ्यांची नियुक्ती करणे अशक्य आहे, असे असतानाही विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत पदोन्नतीचे राजकारण करण्याचा खटाटोप चालविला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने नुकताच पशुधन विकास अधिकारी गट ब या पदाच्या १२५ जागांकरिता पदोन्नतीचे आदेश निर्गमित केले आहे. ही पदे पुर्णपणे पदविकाधारक सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गातूनच सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीने भरावयाची असतात. त्यामुळे या पदावर पदविकाधारक विद्यार्थ्यांची नियुक्ती करणे अशक्य आहे, असे असतानाही विद्यार्थ्यांची दिशाभूल करीत पदोन्नतीचे राजकारण करण्याचा खटाटोप चालविला आहे. आंदोलनाकरिता विद्यार्थ्यांच्याच खांद्याचा वापर होत असल्याचा आरोप करीत दोन संघटना आमने-सामने उभ्या ठाकल्या आहे.
राज्याच्या प.दु.म. विभागात राज्यस्तरीय संस्थेत पशुधन पर्यवेक्षकांची ७७४, सहायक पशुधन विकास अधिकारी २७४ पदे मंजूर असून जिल्हा परिषदे अंतर्गत पुशधन पर्यवेक्षकांची २९८० व सहायक पशुधन विकास अधिकारी ५०९ पदे मंजूर आहेत. पशुधन पर्यवेक्षक संवर्गाच्या सेवा प्रवेश नियमानुसार ९० टक्के पदे सरळ सेवेने तर १० टक्के पदोन्नतीने भरल्या जातात. सहायक पशुधन विकास अधिकर ही पदे १०० टक्के पदोन्नतीची पदे असून पशुधन पर्यवेक्षक संवर्गातून सेवाज्येष्ठतेनुसार भरल्या जातात. पशुधन विकास अधिकारी संवर्गाची राज्यात एकूण २५७५ पदे मंजूर असून पशुधन विकास अधिकारी सेवा भरती नियमाच्या २२ डिसेंबर १९८८ मधील तरतुदीनुसार ८५ टक्के (२१८९ पदे) सरळसेवेने पदविधारकांमधून व १५ टक्के (३८६ पदे) सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गातून (जिल्हा परिषद व राज्यस्तरीय संवर्गातून ५०:५० टक्के) भरण्याची तरतुद आहे. त्यानुसार राज्याच्या पशुसंवर्धन विभागाने शासन आदेश ८ मार्च २०१९ अन्वये पशुधन विकास अधिकारी गट ब या पदांच्या १२५ जणांच्या पदोन्नतीचे आदेश निर्गमीत केले. त्यानुसार सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती करण्यात आली. ही नियुक्ती भारतीय पशुवैद्यक परिषद कायदा १९८४ च्या तरतुदीच्या अधिन राहूनच करण्यात आलेली आहे. असे असतानाही ही पदोन्नती नियमबाह्य असून भविष्यात विद्यार्थ्यांना मिळणारी पदे शासनाने पदोन्नतीने भरल्या, असा खोटा प्रचार करुन महाराष्ट्र राज्य राजपत्रीत पशुवैद्यक संघटनेने पशुवैद्यक विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने केला आहे. त्यामुळे या दोन संघटनेनेच्या राजकारणात मात्र विद्यार्थी भरडल्या जात आहे.
या नियमानुसार मिळाली पदोन्नती
च्पशुधन विकास अधिकारी संवर्गातील १५ टक्के पदोन्नतीची पदे सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गातून भरण्यासाठी दोन वर्षाचा सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम पुर्ण करण्याची तरतुद होती. त्यानुसार आजपर्यंत ही पदे पदोन्नतीने भरल्या गेली. शासनाने सन २००१ साली सेवांतर्गत पदविका अभ्यासक्रम बंद केल्यामुळे ही १५ टक्के पदे भरण्यासाठी व सहायक पशुधन विकास अधिकारी संवर्गातील कर्मचाऱ्यांना कालबद्ध पदोन्नती व सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीच्या संधी कायम ठेवण्यासाठी विभागाने पशुधन विकास अधिकारी गट ब अन्वये मंजूर केला. त्यानुसारच ही पदोन्नतीही देण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची या पदावर नियुक्ती होणे अशक्य असून विद्यार्थ्यांची दिशाभूल केली जात असून आचारसंहितेच्या काळात त्यांना आंदोलन करण्यासाठी प्रवृत्त केले जात असल्याचा आरोप पशुचिकित्सा व्यवसायी संघटनेने केला आहे.