चित्तथरारक कवायतींनी विद्यार्थी थक्क
By admin | Published: January 3, 2017 01:16 AM2017-01-03T01:16:44+5:302017-01-03T01:16:44+5:30
अंगावरून जाणारी दुचाकी, वेळी-अवेळी आलेल्या प्रसंगांना सामोरे जाणारे पोलीस, गोळीबार आदी गोष्टी अनेकांनी
‘पोलीस रायजिंग डे’निमित्त कार्यक्रम : चिमुकल्यांना दिली कामकाजाची माहिती
वर्धा : अंगावरून जाणारी दुचाकी, वेळी-अवेळी आलेल्या प्रसंगांना सामोरे जाणारे पोलीस, गोळीबार आदी गोष्टी अनेकांनी हिंदी सिनेमात अनुभवल्या आहेत. हेच चित्तथरारक दृश्य वर्धा पोलिसांनी करून दाखविल्याने विद्यार्थी थक्क झाले.
निमित्त होते, पोलीस रायजींग डे चे! या दिनानिमित्त पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी विविध कार्यक्रमांनी हा दिवस साजरा करण्यात आला. शिवाय शालेय विद्यार्थ्यांना पोलीस विभागात होणाऱ्या कामांची माहिती देण्यात आली. यावेळी केसरीमल कन्या शाळा, न्यू इंग्लिश शाळा, रत्नीबाई विद्यालय, महिला आश्रम विद्यालय येथील ३०० विद्यार्थी व त्यांचे शिक्षक उपस्थित होते.
पोलीस मुख्यालय येथील कवायत मैदानावर बुलेट वाहनाचे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. तसेच धनूर्विद्या, कराटे यांचेही प्रात्याक्षिक दाखविण्यात आले. वर्धा जिल्हा पोलीस दलाकडे असलेली अत्याधुनिक हत्यारे व दारूगोळा यांचे प्रदर्शन दाखविण्यात आले व त्याची माहितीही देण्यात आली. बॉम्ब शोधक व नाशक पथक यांच्या कार्यालयाला भेट देऊन तेथे करण्यात येत असलेल्या कामाबाबत माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली. वाहतूक नियमांबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. सदर कार्यक्रमाला १५० पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी प्रात्याक्षिके करून उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनींना विविध विषयाची माहिती दिली. सदर कार्यक्रमाकरिता पोलीस अधीक्षक अंकित गोयल, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय रवींद्र किल्लेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, वाहतूक पोलीस निरीक्षक भगवान खारतोडे, राखीव पोलीस निरीक्षक एस.पी. ठवरे यांनी कामगिरी केली.(प्रतिनिधी)
जिल्ह्यातील अन्य पोलीस ठाण्यांतही कार्यक्रम
४पोलीस रायजींग डे निमित्त जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यात पुलगाव, देवळी, आर्वी, आष्टी (श.), कारंजा (घा.), समुद्रपूर, हिंगणघाट, दहेगाव (गो.), सिंदी (रेल्वे), गिरड, अल्लीपूर, वडनेर, सेलू, तळेगाव (श्या.पं.), खरांगणा (मो.), रामनगर, सावंगी (मेघे) व सेवाग्राम पोलीस ठाण्यांत तेथील पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनात कार्यक्रम घेण्यात आले. यात विद्यार्थ्यांना तथा नागरिकांना पोलिसांच्या कार्याची माहिती देण्यात आली.