न्यायालयाच्या निर्देशानंतरही विद्यार्थ्याच्या अटकेचे नाट्य
By admin | Published: February 9, 2017 12:36 AM2017-02-09T00:36:16+5:302017-02-09T00:36:16+5:30
महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील २०१२ मधील एका प्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी
सेवाग्राम पोलिसांचा प्रताप : उपोषण करीत केली कारवाईची मागणी
वर्धा : महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील २०१२ मधील एका प्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ५ वाजता राजीव सूमन या विद्यार्थ्याला अटक केली. ही अटक बेकायदेशीर असल्याने ट्रिब्यूनलचे सदस्य जम्मू आनंद यांनी रात्री ९ वाजता म. गांधी पुतळ्याजवळ उपोषण केले. शिवाय पोलीस निरीक्षकांकडे लेखी तक्रार करीत कारवाईची मागणी केली. ठाणेदारांनी लेखी ग्वाही दिल्यानंतर उपोषण मागे घेतले. सेवाग्राम पोलिसांनी केलेल्या या अटक नाट्याचा बुधवारी पत्रकार परिषदेतून निषेध नोंदविण्यात आला.
किसान अधिकार अभियानच्या कार्यालयात झालेल्या पत्रपरिषदेला अभियानचे प्रेरक अविनाश काकडे, ट्रीब्यूलनचे सदस्य जम्मू नारायण आनंद, विद्यार्थी राजीव सूमन, संजीव चंदन, अशोक मेश्राम आदी उपस्थित होते. यावेळी जम्मू आनंद म्हणाले की, २०१२ मध्ये महात्मा गांधी विद्यापीठात शिकणाऱ्या राजीव सूमन व संजीव चंदन या विद्यार्थ्यांविरूद्ध तत्कालीन कुलपती विभूती नारायण राय व प्रशासनाने पोलिसांत तक्रार केली होती. मायग्रेशन सर्टीफिकेट बोगस असल्याच्या या तक्रारीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. यावर विद्यार्थ्यांनीही विद्यापीठ प्रशासनाविरूद्ध तक्रार केली होती. हे प्रकरण विद्यापीठ प्रशासनाच्या दबावामुळे पोलिसांकडून बंद करण्यात आले होते; पण विद्यार्थ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. यावर २०१४ मध्ये उच्च न्यायालयाने पोलिसांना विद्यार्थ्यांना अटक करण्यात येऊ नये व विद्यापीठ प्रशासनावर कारवाई करावी, असे आदेश दिले. शिवाय तीन सदस्यीय समिती (ट्रीब्यूनल) गठित करून चौकशी करण्याबाबतही आदेशित केले.
यावरून महामहीम राष्ट्रपतींच्या सूचनेनुसार उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश, विद्यापीठ प्रतिनिधी व विद्यार्थी प्रतिनिधी, अशी समिती तयार करण्यात आली. या समितीची चौथी सुनावणी महात्मा गांधी हिंदी विद्यापीठात मंगळवारी होती. यासाठीच राजीव सूमन, संजीव सूमन व ट्रीब्यूनलचे सदस्य विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून जम्मू आनंद हे विद्यापीठात दाखल झाले होते. सुनावणी आटोपल्यानंतर बाहेर पडताच सेवाग्राम पोलिसांनी राजीव सूमन यांना अटक करून पोलीस ठाण्यात आणले. न्यायालयाचे आदेश असताना ही कारवाई योग्य नव्हती; पण विद्यापीठ प्रशासनाच्या सांगण्यावरून सेवाग्राम पोलिसांनी कारवाईचे अस्त्र उगारले.