बसच्या वेळेसाठी खासदारांच्या घरी विद्यार्थ्यांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 09:52 PM2018-09-21T21:52:03+5:302018-09-21T21:52:47+5:30
वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा शाळेच्या वेळेत महामंडळाची बस येत नसल्यामुळे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी खासदार रामदास तडस यांचे घर गाठून जागर केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : वारंवार विनंती अर्ज करून सुद्धा शाळेच्या वेळेत महामंडळाची बस येत नसल्यामुळे संतप्त शालेय विद्यार्थ्यांनी खासदार रामदास तडस यांचे घर गाठून जागर केला.
परिवहन कर्मचाऱ्यांच्या एकंदरीत कार्यपद्धतीबाबत तसेच सवलतीचे पास मिळण्यासाठी होत असलेल्या त्रासाबाबत त्यांना विद्यार्थ्यांनी अवगत करून दिले. रापमच्या अधिकाऱ्यांना खासदारांनी योग्य सूचना द्याव्या अशी मागणीही यावेळी विद्यार्थ्यांनी केली. तालुक्यातील मोमिनपूर येथे सकाळच्या पाळीतील विद्यार्र्थ्यांसाठी एस.टी. बस असल्याने त्यांना शिक्षण कार्यासाठी देवळीत जाणे शक्य होत आहे. परंतु, दुपारच्या पाळीतील विद्यार्थ्यांसाठी बसचा कोणताही वेळ नसल्याने या विद्यार्थ्यांना आॅटोरिक्षाचा आधार घ्यावा लागत आहे.
वेळप्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेत सोडून देण्यासाठी पालकांना त्रास घ्यावा लागत आहे. मोमिनपूर हे गाव अंदोरीपासून ३ कि़मी. अंतरावर आहे. त्यामुळे मोमिनपूर येथील विद्यार्थ्यांना घेवून ही बस व्हाया अंदोरीवरून देवळीला जात असते. मात्र, सकाळी १० ते १०.३० या कालावधीत कुठलीही बस मोमिनपूरला येत नसल्याने विद्यार्थ्यांची व पालकांची फरफट होत आहे.
त्याचप्रमाणे मोमिनपूर ते अंदोरी पर्यंतच्या प्रवासात या विद्यार्थ्यांकडून तिकीटचे पैसे घेतले जातात. परंतु, तिकीट दिल्या जात नसल्याच्या तक्रारी आहेत. देवळी बसस्थानकावर या विद्यार्थ्यांना सवलतीचे पास दिले जात नाही. तर काही एक कारण सांगून त्रास दिला जात आहे. या सर्व गाऱ्हाण्याची खासदार तडस यांनी दखल घेवून संबंधीतांना याबाबत विचारणा करून सुधारणा करण्याचे सांगावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.