आर्वीतील विद्यार्थिनीनी कडधान्यापासून तयार केलेल्या राख्या पाठविल्या सीमेवर
By अभिनय खोपडे | Published: August 25, 2023 05:22 PM2023-08-25T17:22:25+5:302023-08-25T17:27:06+5:30
सोयाबीन, तीळ, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, मुंग, उडीद व कापूस इत्यादीपासून राख्या तयार केल्या.
वर्धा : शेतीत उत्पादन होणाऱ्या कडधान्य शेतमालापासून विद्यार्थीनींनी राख्या तयार करून भारताच्या सीमेवर रक्षण करणाऱ्या जवानांसाठी पाठविल्या हा सोहळा कला, वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, आर्वी येथे रक्षाबंधनाचे निमित्ताने पार पडला. कला,वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय,आर्वी येथील कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने विद्यार्थिनींनी कडधान्य व शेतमालापासून विशेषत: सोयाबीन, तीळ, तांदूळ, डाळ, गहू, ज्वारी, मुंग, उडीद व कापूस इत्यादी उत्पादनापासून सुंदर प्रकारच्या राख्या तयार करून रक्षाबंधनाच्या निमित्ताने भारतीय सीमेवर तैनात असणाऱ्या बीएसएफच्या जवानांकरिता पाठविल्या.
या उपक्रमामध्ये कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनीनी आपला सहभाग नोंदवून जवळपास ५० राख्या तयार केल्या. भारतीय सैनिक सणासुदीच्या काळात देखील सीमेवर तैनात राहून आपल्या देशाचे रक्षण करतात. त्यामुळे त्यांना आपल्या घरची आठवण नको यायला म्हणून विद्यार्थिनींनी ही अभिनव संकल्पना राबवून या सर्व राख्या त्या जवानांना पाठवून देशाबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त केल्यात. सोबतच शेतकऱ्यांच्या मुलींनी शेतकऱ्यांच्या उत्पादनापासून राख्या तयार केल्यात त्यामुळे पुन्हा जय जवान, जय किसान ही भावना वाढीस लागण्यास मदत झाली. अशी राखी तयार करणाऱ्या मुलींनी प्रतिक्रिया दिली.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिभाऊ वेरुळकर, कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख प्रा धर्मेंद्र राऊत,डॉ.भावना खंडाळकर,प्रा.राजेंद्र ढगे, प्रा.हमिद शेख,डॉ.गणेश मस्के,प्रा. मोहन कुंभरे, प्रा.नितीन शिरपूरकर,प्रा.लखन जाधव, प्रा. तनुज काळे,प्रा.प्रगती कोरडे आदी प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.