विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण मिळावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2017 01:04 AM2017-09-06T01:04:09+5:302017-09-06T01:04:25+5:30
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांच्या मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, असा आग्रह महात्मा गांधीचा होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये त्यांच्या मातृभाषेला अनन्यसाधारण महत्व आहे. यामुळे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या मातृभाषेतून शिक्षण मिळावे, असा आग्रह महात्मा गांधीचा होता. त्याचबरोबर शिक्षणामध्ये श्रमाला सुद्धा महत्व दिले गेले. तेव्हाच विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास होऊन विद्यार्थी स्वावलंबी होतील आणि परावलंबी झालेले आजचे खेडे परत स्वावलंबी होण्याच्या दिशेने वाटचाल करतील, असे वक्तव्य सेवाग्राम आश्रमाचे सचिव डॉ. श्रीराम जाधव यांनी केले.
स्थानिक यशवंत महाविद्यालय येथे मराठी विद्यार्थी अभ्यास मंडळाच्या उद्घाटनप्रसंगी ‘मोहन ते महात्मा’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले. यावेळी प्रमुख वक्ता म्हणून ते वोलत होते.
जाधव पुढे म्हणाले, आजच्या तरूण पिढीमध्ये गांधीजीबद्दल अनेक गैरसमज दिसून येतात. ते दूर करावयाचे असेल तर त्यांच्या जीवनाचा आणि तत्वांचा विचार करणे आवश्यक आहे. त्यासाठी आजच्या तरूण पिढीने वाचनाचा छंद जोपासावा असे सांगितले. गांधीजीचे तत्वज्ञान समाजापर्यंत पोहोचविण्याची खरी गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. विलास देशमुख यांनी केले.
आज मराठी भाषा व साहित्याच्या खेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी लेखन कला अवगत करणे आवश्यक आह. म्हणजे विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र, जाहिरात, दूरदर्शन, चित्रपट यासारख्या क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, असे मत मराठी विभाग प्रमुख प्रा. डॉ. खोडे यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा. नारायणे यांनी करून दिला. यावेळी मराठी विद्यार्थी अभ्यास मंडळाची २०१७-२०१८ या शैक्षणिक सत्रासाठी कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्ष प्रगती भोजराज पुरी, उपाध्यक्ष गौरव धर्मपाल तामगाडगे, सचिव कांचन नेहारे तर सदस्य कल्याणी किशोर काळे, चैताली शाम भुजाडे, सपना संजय कोल्हे, आरती हरिभाऊ काळे, आचल ज्ञानेश्वर ढोक, पल्लवी राजेंद्र झाडे, भक्ती राजेंद्र घरझोडे यांची निवड केली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठांतर्गत घेण्यात परीक्षेमध्ये महाविद्यालयातून प्रथम आल्याबद्दल विणालाल उपरीकर, प्रगती पुरी यांचा सत्कार केला. निबंध स्पर्धेतील निकलेश म्हैसकर यांचा सन्मान केला. संचालन गौरव तामगाडगे यांनी तर आभार कांचन नेहारे यांनी मानले.