शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थ्यांची तहसीलवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 02:05 AM2017-08-12T02:05:22+5:302017-08-12T02:05:46+5:30
विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्याकरिता विदर्भ राज्य आघाडच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सहभागाने हिंगणघाट तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : विद्यार्थ्यांची प्रलंबित शिष्यवृत्ती तात्काळ देण्याकरिता विदर्भ राज्य आघाडच्यावतीने विद्यार्थ्यांच्या सहभागाने हिंगणघाट तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. येथील नंदोरी चौक येथून निघालेल्या मोर्चात हजारो विद्यार्थी सहभागी होते.
मोर्चाचे नेतृत्त्व विदर्भ राज्य आघाडीचे उपाध्यक्ष अनिल जवादे यांनी केले. केंद्र व राज्य सरकारद्वारे विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती, थकीत असलेली शिष्यवृत्ती त्यांना तातडीने देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली. या मागणीचे निवेदन उपविभागीय अधिकारी यांच्यावतीने पंतप्रधान, मुख्यमंत्री, समाजकल्याण मंत्री, जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आले.
या निवेदनात शासनाकडे थकीत असलेली शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना तातडीने वाटप करण्याची प्रमुख मागणी करण्यात आली. सन २०१२-१३ मध्ये आॅनलाईन भरलेले व स्वीकारलेले अर्ज मंजूर करण्यात यावे. वाढत्या महागाईमुळे सध्या मिळत असलेल्या शिष्यवृत्तीची रक्कम अत्यल्प आहे. या रक्कमेत शैक्षणिक खर्च भागत नसल्यामुळे वाढ करण्यात यावी. सन २०११ मध्ये जिल्ह्यातील शिष्यवृत्ती घोटाळ्यात अपहार झालेल्या रक्कमेची वसुली करण्यात यावी. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांवरील संपूर्ण कर्ज माफ करण्यात यावे. या कुटुंबातील विद्यार्थ्यांना संपूर्ण शिक्षण मोफत देण्यात यावे. या मागण्यांना निकाली काढण्याचे निवेदन देण्यात आले.
विद्यार्थ्यांच्या थकीत व वाढीव शिष्यवृत्तीकरिता काढण्यात आलेला विद्यार्थ्यांचा राज्यातील पहिलाच मोर्चा ठरला. या मोर्चामध्ये सहभागी विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती न मिळाल्यामुळे कोणत्या विवंचनेत शिक्षण घ्यावे लागते याची व्यथा मांडली.
मोर्चात विदर्भ राज्य आघाडीचे सचिव नीरज खांदेवाले, विधानसभा क्षेत्र अध्यक्ष बंटी रघाटाटे, शहरध्यक्ष शकील अहमद, अश्विनी तावाडे, सुनिता भितघरे, अजय मुळे, जयंत धोटे, विक्की भितघरे, महेश माकडे, गोकुल पाटील, रहेमत खॉ पठाण, प्रवीण हटवार यांच्यासह विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.
नंदोरी चौक येथे हजारोंच्या संख्येने विद्यार्थी व विदर्भ राज्य आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.