विद्यार्थ्यांनी रोखली बस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 10:28 PM2018-07-26T22:28:28+5:302018-07-26T22:28:56+5:30
चिकणी येथील शिक्षणासाठी तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथे दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण देवळी येथेच घ्यावे लागते. असे असतानाही रापमच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मज्जावच केल्या जात असे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिकणी (जामणी) : चिकणी येथील शिक्षणासाठी तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथे दररोज ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण देवळी येथेच घ्यावे लागते. असे असतानाही रापमच्या बसमध्ये विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी मज्जावच केल्या जात असे. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती निर्माण झाली होती. विद्यार्थ्यांना रापमच्या बसचालकांसह वाहकाने बसमध्ये बसु द्यावे, या मागणीसाठी गुरूवारी विद्यार्थ्यांनी चिकणी येथे रास्तारोको आंदोलन केले.
जामणी येथून निमगाव व जामणीचे विद्यार्थी शिक्षणासाठी देवळी येथे ये-जा करतात. सकाळी ७.१५ ला पुलगाव-नागपूर बस येथून जाते. परंतु, सदर बसचालक व वाहक जामणी व चिकणी येथून विद्यार्थ्यांना बसमध्ये चढण्यास मज्ज्वाव करतात. विद्यार्थी न घेताच बस निघून जाते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून बसच रोकुन धरली. सकाळी पुलगाव-नागपूर ही बस चिकणी (जामणी) येथे आली असता बसमध्ये गर्दी असल्याचे कारण पुढे करीत विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू देण्यास मज्जाव करण्यात आला. दरम्यान संतप्त विद्यार्थ्यांनी बसच रोखून धरली. सुमारे तासभर हे आंदोलन सुरू राहिल्याने या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. आंदोलनाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठले. पोलिसांच्या मध्यस्तीअंती आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी माघार घेतली. शिवाय देवळी-दहेगाव बससेवा सुरू करण्याच्या मागणीचे निवेदन पोलिसांच्या माध्यमातून रापमच्या अधिकाऱ्यांना पाठविण्यात आले. सदर निवेदनाची प्रत भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने, देवळीचे ठाणेदार ठाकुर, रा.प.म.च्या विभागीय वाहतूक अधिकारी स्मीता सुतवने यांना पाठविण्यात आले आहे.
आठ गावातील विद्यार्थी करतात ये-जा
तालुक्याचे स्थळ असलेल्या देवळी येथे शिक्षणासाठी मलकापूर, केळापूर, दहेगाव (गावंडे), देहगाव (स्टेशन), निमगाव (सबाने), जामणी, चिकणी, पढेगाव या आठ गावांमधील विद्यार्थी ये-जा करतात.
आजपासून पढेगाव मार्गाची बस सुरू करण्यात आली आहे. तसेच दहेगाव (स्टेशन), जामणी, चिकणी येथील विद्यार्थ्यांकरिता दोन-तीन दिवसात सकाळी ७.१५ वाजता एक अतिरिक्त बस फेरी वाढवणार आहे.
- स्मीता सुतवने
विभागीय वाहतुक अधिकारी, रा.प.म. वर्धा.