मराठी शाळेकडे वळविले विद्यार्थ्यांचे पाऊल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:00 AM2020-01-13T06:00:00+5:302020-01-13T06:00:10+5:30
या शाळेतील परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्णत: पालटली आहे. नव्याने बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून शाळेतील भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढीवरही भर दिला आहे. शाळेच्या परिसरासह वर्गखोल्याही बोलक्या असल्याने शाळेकडे आपसूकच विद्यार्थ्यांची पावले वळत आहेत. यावर्षी या शाळेत इंग्रजी माध्यमात शिक्षणाऱ्या ११ विद्यार्थ्यांनी विविध वर्गामध्ये प्रवेश घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मराठी शाळा म्हटल्या की, पालक नाक मुरडतात. मराठी शाळा ओस पडत असून इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही. अशाही परिस्थितीत हार न मानता आपल्याही शाळेत इंग्रजी माध्यमांच्या शाळांना लाजवेल अशी व्यवस्था उभी केली. परिणामी, इंग्रजी माध्यमांतील विद्यार्थ्यांची पावले मराठी शाळेकडे वळविण्यात लोणसावळी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांनी यश मिळविले आहे.
या शाळेतील परिस्थिती गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये पूर्णत: पालटली आहे. नव्याने बदलून आलेल्या शिक्षकांनी परिश्रम घेत विविध माध्यमातून निधी उपलब्ध करून शाळेतील भौतिक सुविधांसह गुणवत्ता वाढीवरही भर दिला आहे. शाळेच्या परिसरासह वर्गखोल्याही बोलक्या असल्याने शाळेकडे आपसूकच विद्यार्थ्यांची पावले वळत आहेत. यावर्षी या शाळेत इंग्रजी माध्यमात शिक्षणाऱ्या ११ विद्यार्थ्यांनी विविध वर्गामध्ये प्रवेश घेतला आहे. शाळेमध्ये सुंदर व स्वच्छ परिसर, दोन हॅण्डवॉश स्टेशनसह विद्यार्थ्यांच्या अध्यापनासाठी तीन एलईडी संच आहेत. संगणक कक्ष आणि टॅबद्वारे विद्यार्थ्यांना साध्या व सोप्या भाषेत शिकविले जात असल्याने गुणवत्ताही सुधारली आहे. परिसरातील डोरली, शेकापूर, दुगाघरी व पोडवस्तीतील विद्यार्थीही आता या शाळेत शिक्षणाचे धडे घेत आहेत.
पुस्तकी ज्ञानासोबतच क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. सर्वच शिक्षक जास्तीत जास्त वेळ विद्यार्थी घडविण्यासाठी खर्ची घालत आहेत.
पालकांचा व्हॉटसअॅप ग्रुप
शाळेत होणारे उपक्रम व दैनंदिन अध्यापनाची माहिती पालकांना व्हावी याकरिता पालकांचा वर्गनिहाय व्हॉट्सअप ग्रुप तयार करण्यात आला आहे. त्यामुळे वर्षभर पालक शाळेच्या संपर्कात राहतात.
अल्पावधीत शाळेच्या वातावरणात झालेला हा बदल पाहून शाळांना जिल्हा परिषदेच्या अधिकारी व पदाधिकाऱ्यांनीही भेटी दिल्या आहे. काही दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व आरोग्य समिती सभापती जयश्री सुनील गफाट यांनी विद्यार्थ्यांशी हितगूज केले.
आम्ही शाळेतील मुलांचे पालकत्वच स्वीकारले आहे. कोणत्याही मुलाला शिक्षणासाठी रुपयाही खर्च करू देत नाही. सर्व खर्च आम्ही शाळेतील शिक्षकच करतो. रोजच्या अध्यापनाची माहिती पालकांना दिली जात असून पालकांनाही नियमित आम्ही शाळेच्या संपर्कात ठेवत आहे. त्यामुळे प्रगतीला हातभार लागत आहे.
- दिलीप भोवरे, शिक्षक
या शाळेत नवीन शिक्षक बदलीहून आले आणि शाळेचे रूप पालटून गेले. माझी मुलगी सिमरन ही इंग्रजी शाळेत होती पण; येथील शिक्षकांच्या म्हणण्यानुसार या शाळेत प्रवेश दिला. तिची प्रगती पाहून आनंदी आहे. येथील शिक्षक मुलांना पालकांसमान वागणूक देत असल्याने आता दुसऱ्या मुलीलाही याच शाळेत प्रवेश देणार आहे.
- शिल्पा सतीश बेले, पालक
शाळेला मदतीचा हात
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता आमदार निधी, जि.प.चा सेस फंड, डीपीडीसी फंड, बजाज फाऊंडेशन, ग्रामपंचायतीसह गावातील नागरिकांकडूनही मदतीचा हात मिळाला आहे.