रशियातील विद्यार्थ्यांचा मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 02:14 PM2020-06-06T14:14:27+5:302020-06-06T14:16:50+5:30
कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये रशियात अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा लोकमतच्या पाठपुराव्यानंतर मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १७ जून रोजी दीडशेवर विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू करतील.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये रशियात अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचा लोकमतच्या पाठपुराव्यानंतर मायदेशी परतण्याचा मार्ग सुकर झाला आहे. १७ जून रोजी दीडशेवर विद्यार्थी परतीचा प्रवास सुरू करतील. रशियातील विविध वैद्यकीय विद्यापीठांत महाराष्ट्रातील हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत असून यात विदर्भातील दीडशे विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
कोरोनाने रशियात अक्षरश: थैमान घातले असून यामुळे कठोर टाळेबंदी लागू आहे. विद्यार्थ्यांना विदेशातील ही टाळेबंदी अत्यंत जाचक ठरत असून त्यांची मोठी कोंडी झाली आहे. याविषयी हे विद्यार्थी पालकांना दररोज कळवितात. मात्र महाराष्ट्रात विमान उड्डाण करण्यास मनाई असल्याने परतीच्या प्रवासाची अडचण निर्माण झाली होती. प्रवासाबाबत मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. भारतातील अन्य राज्यांप्रमाणेच राज्याच्या अन्य विमानतळावर रशियातून थेट विमान पाठविण्याचा दाखला विद्यार्थ्यांनी दिला होता. यासंदर्भात आमदार डॉ. पंकज भोयर यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तर भाजपचे जिल्हा महामंत्री अविनाश देव यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे व्यथा मांडली.
गडकरी यांनी रशियातील भारतीय दुतावास तसेच विदेश मंत्रालयाकडे विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासाबाबत पाठपुरावा केला. महाराष्ट्र शासनाच्या परवानगीनंतरच राज्यातील प्रवास शक्य होणार असल्याचे स्पष्ट झाल्यावर त्या दृष्टीने पत्रव्यवहार झाला. अखेर संमती मिळाल्याने १७ जून रोजी १६८ विद्यार्थ्यांना घेऊन येणारे विमान दिल्लीला १८ जूनला पोहोचेल. त्यानंतर दिल्ली ते नागपूर असा प्रवास होणार आहे. सुरुवातीचे सात विद्यार्थ्यांना नागपुरातच इन्स्टिट्युशनल क्वारंटाईन व्हावे लागणार असून हा सर्व खर्च विद्यार्थ्यांनाच सोसावा लागणार आहे. एरवी २० ते २५ हजार रुपयांत प्रवास आता ५१ हजार रुपयांना पडणार आहे. मात्र, खर्च ही दुय्यम बाब आहे, असे मत अडकलेल्या विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेले आहे. विशेष बाब म्हणजे, रशियात अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्याबाबत लोकमत'ने सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच रशियन दुतावासातील बिनया श्रीकांत प्रधान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कामात मोठा पाठपुरावा केल्याचे विद्यार्थ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महाराष्ट्रातील विद्यार्थी रशिया, कझाकिस्तान व इतर देशांत वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांचे पालक प्रत्यक्ष भेटून तसेच ई-मेलच्या माध्यमातून मायदेशी परत आणण्याकरिता विनंती करीत होते. विद्यार्थ्यांना परत आणण्याकरिता आवश्यक माहिती व यादी पाठवून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी आणि एस. जयशंकर यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. अखेर मागणीला यश आले.
-रामदास तडस,
खासदार, वर्धा लोकसभा