मागण्यांच्या पूर्ततेसाठी विद्यार्थीही बसले उपोषणाला
By admin | Published: May 14, 2016 02:02 AM2016-05-14T02:02:43+5:302016-05-14T02:02:43+5:30
गत चार दिवसांपासून आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहे.
आंदोलनाचा चौथा दिवस: मागण्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष
आर्वी : गत चार दिवसांपासून आर्वी तालुक्यातील निंबोली (शेंडे) येथील प्रकल्पग्रस्त उपोषणाला बसले आहे. चार दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या ग्रामस्थांची अद्याप संबंधित यंत्रणेने दखल न घेतल्याने याबाबत गावकऱ्यांत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान या उपोषणाला पाठिंबा म्हणून गावातील विद्यार्थी उपोषणाला बसले आहेत.
चार दिवसांपासून गावकऱ्यांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. देऊरवाडा मार्गे निंबोली (शेंडे) गावात जाणाऱ्या रस्त्याची अवस्था बिकट झाल्याने गावात परिवहनची बस येत नाही. या गावातील विद्यार्थ्यांना चार ते सहा किमी पायपीट करीत देऊरवाडा येथे शाळेत जावे लागते.
सध्या हे सर्व विद्यार्थी खाजगी वाहनाने गत दोन महिन्यापासून आर्थिक भुर्दंड सहन करीत शाळा गाठत आहेत. ज्यादिवशी गावात खाजगी वाहन येत नाही किंवा रस्त्यात वाहनामध्ये बिघाड झाल्यास शाळेत, विद्यार्थी उशिरा पोहचतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची ओरड ग्रामस्थ करीत आहे.
गावात बस येण्यासाठी रस्त्याची कायम दुरूस्ती करावी व नियमित बससेवा देण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहे. मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला असून विद्यार्थीही उपोषण सुरूच ठेवणार असल्याचे सांगण्यात येते.(तालुका प्रतिनिधी)