विद्यार्थ्यांनी रोखली तासभर जलद बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2018 09:53 PM2018-09-27T21:53:24+5:302018-09-27T21:54:07+5:30

मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला.

Students stay fast enough for an hour | विद्यार्थ्यांनी रोखली तासभर जलद बस

विद्यार्थ्यांनी रोखली तासभर जलद बस

Next
ठळक मुद्देविद्यार्थ्यांची ताटकळ : चार दिवसांपासून बस होताहेत नादुरूस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
देवळी : मागील चार दिवसांपासून गौळ, कोळोणा (चोरे) व टाकळी (खोडे) या गावात जाणारी बस नेमकी शाळा सुटण्याच्या वेळेवर नादुरुस्त होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांना बसत असल्याचे गुरुवारी चवथ्या दिवशी विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध फुटला. बसच्या प्रतीक्षेत भुकेने व्याकूळ झालेल्या विद्यार्थ्यांनी अमरावती-हिंगणघाट ही जलद बस तासभर रोखून धरली. पोलिसांच्या मध्यस्तीनंतर पर्यायी व्यवस्था केल्यानंतर विद्यार्थी शांत झाले.पण, तोपर्यंत परिवहन महामंडळाच्या दैनावस्थेचे वाभाडे निघाले.
देवळी हे तालुक्याचे ठिकाण असल्याने परिसरातील विद्यार्थी दररोज देवळीत शिक्षणाकरिता येतात. सकाळी शाळा सुटल्यानंतर देवळी स्थानकावरुन दुपारी १२ वाजतादरम्यान गौळ, कोळोणा व टाकळी (खोडे ) या गावातील विद्यार्थ्यांसाठी बसची व्यवस्था आहे. परंतु ही बस मागील चार दिवसांपासून देवळी बसस्थानकावर आल्यानंतर पंक्चर होते. त्यामुळे सकाळी आलेल्या विद्यार्थ्यांना दुपारी २ वाजतापर्यंत उपाश्यापोटी ताटकाळत रहावे लागते. बुधवारी बस पंक्चर झाल्याचे लक्षात आल्यानंतर स्थानकावरील विद्यार्थ्यांनी बसचालकाला मदत केली. गाडीचे चाक काढण्यापासून पंक्चर दुरुस्त्त करेपर्यंत सहकार्य केले. तेव्हा कुठे ती बस दोनवाजेपर्यंत दुरूस्त झाल्याने तीन-साडेतीन वाजता गावात पोहचली. पुन्हा गुरुवारलाही तोच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांचा संयम ढळला. त्यांनी जलद बस अडवून धरत परिवहन महामंडळाच्या निद्रिस्त प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच पोलिसांनी मध्यस्ती केल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या गावचा रस्ता धरला.
नवीन टायर नसल्याने पंक्चरचे प्रमाण वाढले
पुलगाव डेपोला नवीन टायरचा पुरवठा केला नसल्याने पुर्णत: घासलेले जुने टायर वापरले जात आहे. ग्रामीण भागात धावणाऱ्या बसगाड्यांसाठी वापरले जाणारे टायर टाकावू स्वरूपाचे असल्याने वेळोवेळी पंक्चर होत आहे. याचा फटका विद्यार्थ्यांसह प्रवाशांनाही सहन करावा लागत आहे. चालक व वाहकांनाही प्रवाशांच्या रोषाला समोरे जावे लागते.
जबाबदार अधिकाऱ्याची नेमणूक करा
देवळी बसस्थानकावर परिवहन महामंडळाचा जबाबदार व्यक्ती नसल्याने प्रवाशांची व विद्यार्थ्यांची तारांबळ उडत आहे. याठिकाणी कार्यरत महिला कर्मचारी विद्यार्थ्यांना सवलतीची पास देताना वेठीस धरतात. तसेच प्रवाशी व विद्यार्थ्यांना उद्धट वागणूक देतात. त्यामुळे तालुक्याचे ठिकाण असलेल्या बसस्थानकावर जबाबदार व समजदार कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Students stay fast enough for an hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.