एसटीअभावी विद्यार्थ्यांची पायपीट
By admin | Published: September 17, 2016 02:23 AM2016-09-17T02:23:48+5:302016-09-17T02:23:48+5:30
परिवहन महामंडळाच्या बसगाड्या केव्हाही रस्त्याने बंद पडतात यात किंचितही शंका नाही.
बसफेरी होते वेळीच रद्द : पडेगाव ते चिकणी पायी प्रवास
चिकणी (जामणी) : परिवहन महामंडळाच्या बसगाड्या केव्हाही रस्त्याने बंद पडतात यात किंचितही शंका नाही. असा कोणत्याही क्षणी रद्द होणाऱ्या एसटीचा फटका काय असतो, हे पडेगाव येथील विद्यार्थ्यांव्यतिरिक्त कोणीच सांगू शकत नाही. देवळी येथे शिक्षणाकरिता जाणाऱ्या या विद्यार्थ्यांना वेळप्रसंगी पायी जात दुसरे गाव गाठण्याची वेळ येते.
पडेगाव या गावाची लोकसंख्या जवळपास दोन हजारावर आहे. गावात कुठलीही उच्च शिक्षणाची सोय नसल्याने येथील विद्यार्थी देवळी येथे शिक्षणाकरिता जातात. येथे जाण्याकरिता या विद्यार्थ्यांना एसटी बस शिवाय दुसरा मार्ग नाही. येथे वर्धा आगाराची वर्धा-राळेगाव (यशवंती) ही बस येते; परंतु ही बस आठवड्यात दोन ते तीन दिवस येतच नाही. यात कडी म्हणजे ही बस सदा नादुरुस्तच राहते. या बसची वेळ सकाळी ७ वाजताची आहे. म्हणून विद्यार्थी साडेसात वाजेपर्यंत वाट बघतात. बस न आल्यामुळे त्यांना चिकणी येथे यावी यावे लागते. चिकणीला येवून सुद्धा तासनतास थांबावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. हे नुकसान होऊ नये व विद्यार्थ्यांची पायपीट थांबावी याकरिता राज्य परिवहन मंडळाने येथे सुरळीत बससेवा देण्याची मागणी पालकांची आहे.(वार्ताहर)