चिखलाच्या रस्त्यामुळे विद्यार्थी त्रस्त
By Admin | Published: July 17, 2016 12:33 AM2016-07-17T00:33:11+5:302016-07-17T00:33:11+5:30
स्थानिक सरस्वती विद्यामंदिर या शाळेपर्यंत जाण्याकरिता योग्य रस्ता नाही. रस्त्यावर चिखलाचे ...
पालकांत असंतोष : प्रशासनाचे दुर्लक्ष
आंजी (मोठी) : स्थानिक सरस्वती विद्यामंदिर या शाळेपर्यंत जाण्याकरिता योग्य रस्ता नाही. रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य असल्याने विद्यार्थ्यांना शाळेत जाताना त्रास सहन करावा लागतो. याकडे शाळा व ग्रा.पं. प्रशासनाचेही दुर्लक्ष होत आहे. संबंधितांनी लक्ष देत कार्यवाही करणे गरजेचे झाले आहे.
रस्त्यावर साचलेला चिखल पाहून पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. वर्धा ते आर्वी मार्गावरील पुनर्वसनमध्ये सरस्वती विद्यामंदिर आहे. आंजीत गत काही वर्षांपासून ती कार्यरत आहे. इंग्रजी माध्यमाची शाळा असल्याने स्थानिकांसह लगतच्या गावांतील पालकांनी आपल्या पाल्यांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून या शाळेत दाखल केले; पण अपेक्षित सुविधा पुरविल्या जात नसल्याची ओरड होत आहे. आर्वी ते वर्धा मार्गावरील काही अंतरावर शाळेची इमारत आहे. इमारत परिसरात झाडे-झुडपे वाढली आहे. शाळेत जाण्याकरिता योग्य रस्ता नाही. खडीकरणाचा रस्ता आहे. या मार्गावर पाण्याचे डबके साचले आहे. विद्यार्थ्यांना डबक्यातून मार्ग शोधावा लागतो. रस्त्याच्या दुरवस्थेबाबत काही पालकांनी मुख्याध्यापिकेला निवेदन दिलेल पण त्यांनी कुठलीच भूमिका घेतली नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने त्या रस्त्याकडे लक्ष पुरविणे गरजेचे होते; पण त्यांच्याकडूनही दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे पालकांत असंतोष पसरला आहे. शाळा व्यवस्थापन समिती आणि ग्रा.पं. प्रशासनाने याकडे लक्ष देत रस्त्याची दुरूस्ती करावी, अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.(वार्ताहर)