बससाठी विद्यार्थ्यांची सायंकाळपर्यंत फरफट
By admin | Published: September 29, 2014 11:10 PM2014-09-29T23:10:48+5:302014-09-29T23:10:48+5:30
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही
आकोली : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वेळापत्रक केवळ भिंतीची शोभा वाढविणारे ठरत असल्याच्या प्रत्यय येथील विद्यार्थ्यांना वारंवार येतो. मात्र संबंधित विभागाकडून याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही. यामुळे या शाळकरी विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतरही सायंकाळपर्यंत नाहक प्रतीक्षा करावी लागते.
विभागाकडून बसकरिता केलेले वेळापत्रकाचे पालन होत नाही. हे यावरुन दिसून येते. मात्र यात विद्यार्थ्यांची नाहक फरफट होत आहे. यामुळे विद्यार्थी व पालकवर्गात संताप व्यक्त होत आहे. परिसरातील शेकडो विद्यार्थी शिक्षणाकरिता नियमित शहरात येतात. येथील ग्रामीण भागात सातवी पर्यंत शाळा असल्याने पुढील शिक्षणाकरिता शहर गाठावे लागते.
हे विद्यार्थी अप-डाऊन करीत असल्याने त्यांना बसवर निर्भर असावे लागते. वर्धा शहरातील विविध महाविद्यालयात शिकणारी ही मुले कायम बसच्या प्रतीक्षेत असतात. श्रीकृष्ण हायस्कुल व दिनकर विद्यालय येथे शिकणारे विद्यार्थी यांना बसच्या अनियमततेचा फटका सहन करावा लागतो.
नानाविध अडचणीतुन ग्रामीण भागातील पालक आपल्या पाल्यांना शिकवितात. ही मुले सकाळी सात वाजता शाळेकरिता घरुन निघतात. सायंकाळपर्यंत उपाशीतापाशी कधी सुकळी फाट्यावर तर कधी वर्धा बसस्टँड, आर्वी नाका येथे बसची प्रतीक्षा करीत असतात. शाळेनजीकच्या विनंती थांब्यावर जांभया देत झाडाच्या आडोशाने ही मुले उभी दिसतात.
सकाळी शाळा, कॉलेजला जातांनी वेळेवर बस येते. पण परतीच्या वेळी बस वेळेवर येत नसल्याने विद्यार्थ्यांची ताटकळ होते. वेळापत्रकच पाळले जात नसल्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी होत आहे. सायंकाळी शाळा सुटण्याच्या वेळेवर बस येणे अपेक्षीत असताना सुर्य मावळतीला गेला तरी बस येत नाही. यात सुधारणा करुन परतीच्या वेळेतील बस वेळेवर सोडण्याची मागणी आहे.(वार्ताहर)