रात्री ९.३० पर्यंत विद्यार्थ्यांची ताटकळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2017 12:50 AM2017-11-23T00:50:13+5:302017-11-23T00:51:05+5:30
आबाद किन्ही-मोई-मुबारकरपूर या गावाला जाणारी सायंकाळी ५ वाजताची बस चार तास विलंबाने रात्री ९.३० वाजता आली. परिणामी, ४८ विद्यार्थ्यांना थंडीत चार तास ताटकळावे लागले.
ऑनलाईन लोकमत
आष्टी (श.) : आबाद किन्ही-मोई-मुबारकरपूर या गावाला जाणारी सायंकाळी ५ वाजताची बस चार तास विलंबाने रात्री ९.३० वाजता आली. परिणामी, ४८ विद्यार्थ्यांना थंडीत चार तास ताटकळावे लागले. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी आष्टी बसस्थानकावर आंदोलन केले. वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर बस रवाना झाली.
ग्रामीण भागातून तालुकास्थळी शिक्षणासाठी गोरगरिबांची मुले-मुली येतात; पण बस वेळेवर येत नाही. मागील तीन महिन्यांपासून हा प्रकार सुरू आहे. मंगळवारी असाच प्रकार घडला. शाळा सुटल्यानंतर आबाद किन्ही, मोई, मुबारकपूर या तीनही गावातील ४८ विद्यार्थी बसस्थानकावर आले. काळोख होताच येथील समस्यांनी जाणीव करून दिली. स्थानकावर प्रकाशव्यवस्था नाही. महिलांकरिता शौचायल नाही. पिण्याच्या पाण्याची सोय नाही. सर्वत्र घाणीचे साम्राज्य आहे. डासांचा प्रादुर्भाव आहे. या विपरित परिस्थितीत विद्यार्थी आतुरतेने बसची प्रतीक्षा करीत होते.
७ वाजले तरी बस न आल्याने विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. याबाबत हुतात्मा राष्ट्रीय विद्यालयाचे प्राचार्य अनिल वानखडे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी उपमुख्याध्यापक सय्यद अली यांना पाठविले. वरिष्ठांशी बोलून समस्या मार्गी लावण्याची ग्वाही दिली. यानंतर रात्री ९.३० वाजता बस आली. विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केला. यानंतर बस गावाकडे निघाली. आर्वी व तळेगाव आगार व्यवस्थापक अरेरावीची भाषा वापरत आहे. भंगार बस आहे, येण्यास वेळ लोगतो, आम्ही काय करणार, अशी उत्तरे दिली जातात. या बेजबाबदार अधिकाºयांवर त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी गौरी बिटणे, ऋतिका घुले, वैष्णवी खंडाते, पूर्वी कदम, दीक्षा चव्हाण, शीतल राठोड, वैष्णवी कोडापे, रसिका धुर्वे, निकीता राठोड, अर्पिता कोडापे, मृणाली यमगवळी, सुरेखा राठोड आदी विद्यार्थ्यांनी केली आहे.