महिला सदस्य करणार सहा क्षेत्रातील कामकाजाचा अभ्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 11:34 PM2018-02-05T23:34:31+5:302018-02-05T23:34:50+5:30
शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेणे तथा त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेल्या क्षेत्राचा महिला सदस्यांना अभ्यास करता यावा म्हणून जि.प. महिला व बालकल्याण विभागाद्वारे अभ्यास दौरा आयोजित केला जातो.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : शासनाच्या विविध योजनांची माहिती जाणून घेणे तथा त्यांची प्रभावी अंमलबजावणी झालेल्या क्षेत्राचा महिला सदस्यांना अभ्यास करता यावा म्हणून जि.प. महिला व बालकल्याण विभागाद्वारे अभ्यास दौरा आयोजित केला जातो. त्यानुसार सोमवारी सभापती सोनाली कलोडे यांच्या नेतृत्वात दौऱ्यास प्रारंभ झाला. जि.प. अध्यक्ष नितीन मडावी व मुख्य कार्यकारी अधिकारी नयना गुंडे यांनी दौऱ्याला हिरवी झेंडी दाखविली.
शासन अनेक योजना राबविते. अनेक भागात त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली जाते. यामुळे त्या-त्या क्षेत्राचा विकास होतो. अशा क्षेत्रास भेटी देत त्यांची माहिती जाणून घेणे व त्या योजना आपल्या भागात कशा राबविता येतील यासाठी दरवर्षी महिला सदस्यांसाठी हा अभ्यास दौरा आयोजिला जातो. यावेळी ५ ते ११ फेब्रुवारी असा सहा दिवसीय दौरा आयोजित आहे. यात जि.प. महिला सदस्यांसह पं.स. सभापती, सदस्य व ग्रा.पं. सदस्यांचा समावेश केला आहे.
सोमवारी अध्यक्ष व सीईओंनी हिरवी झेंडी दिली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी विवेक इलमे, वित्त अधिकारी एस.बी. शेलके सह जि.प. सदस्य उपस्थित होते. सर्व महिला सदस्य राळेगणसिद्धी, पाटोदा, हिवरेबाजार, दापोरी, परूळेबाजार, मालवण आदी भागांचा दौरा करणार आहे. दौऱ्यात जि.प. उपाध्यक्ष कांचन नांदुरकर, सभापती जयश्री गफाट, सभापती सोनाली कलोडे, नीता गजाम यांच्यासह सर्व महिला सदस्य सहभागी झाल्या आहेत.