चार वैद्यकीय अधिकाऱ्यांवर उपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा
By admin | Published: September 5, 2016 12:35 AM2016-09-05T00:35:51+5:302016-09-05T00:35:51+5:30
येथील ट्रामा केअर यूनिट व उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत; परंतु केवळ चारच डॉक्टर कार्यरत आहे.
रिक्त पदांमुळे ट्रामा केअर कुचकामी : रोज होते १,५०० बाह्यरुग्णांची नोंद
भास्कर कलोडे हिंगणघाट
येथील ट्रामा केअर यूनिट व उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांची १८ पदे मंजूर आहेत; परंतु केवळ चारच डॉक्टर कार्यरत आहे. शंभर खाटांचे रुग्णालय २४ तास सेवा देणारे असून येथे नित्याला १ हजार ५०० बाह्यरुग्णांची तपासणी होत आहे. या चार डॉक्टरांच्या भरोशावर उपजिल्हा रुग्णालयाचा डोलारा उभा आहे. असे असले तरी कार्यरत डॉक्टरांवर अतिरिक्त सेवेचा त्रास व तालुक्यातील रुग्णांची हेळसांड होत आहे. याकडे जिल्हा प्रशानानाने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे.
उपजिल्हा रुग्णालय राष्ट्रीय महामार्ग आणि दिल्ली चैन्नई रेल्वे मार्गावर आहे. तसेच नागपूर, चंद्रपूर, उमरेड, पांढरकवडा, वर्धा या जिल्ह्याच्या मध्यभागी आहे. मोठे शहर, मोठी बाजारपेठ म्हणून या शहराची ओळख आहे. शहराची लोकसंख्या रुग्णसंख्या, अपघाताचे प्रमाण त्यानुसार सर्वपरी उपचारासाठी पूर्ण क्षमतेने डॉक्टरांची उपलब्धता आवश्यक आहे; परंतु केवळ चार डॉक्टर शंभर खाटांच्या या रुग्णलयात २४ तास सेवा देत आहेत.
उपलब्ध डॉक्टरांपैकी एक डॉक्टर अस्थिरोग तज्ज्ञ, दोन डॉक्टर भूलतज्ज्ञ व एक एमबीबीएस आहे. अशास्थितीत त्वचारोग, नेत्ररोग, बालरोग, प्रसुती, शस्त्रक्रिया, साथीचे आजार, आकस्मिक सेवा व अपघाती रुग्णांना तातडीचे उपचार शक्य होत नाही. राष्ट्रीय आरोग्य अभियानाची यामुळे योग्य प्रमाणात अमंलबजावणी होत नाही. रक्तपेढी असून आकस्मिक वेळी रक्त मिळत नाही. या रुग्णालयात अद्ययावत एक्स-रे मशीन नाही, सोनोग्राफी साठी खाजगी केंद्रात जावे लागते. या रुग्णालयात सेवा मिळत नसल्याने नागरिकांना खासगी अथवा नागपूर येथील महागड्या रुग्णालयात जावे लागत आहे. प्रत्येकाला आर्थिकदृष्ट्या हे शक्य होत नाही. यामुळे त्यांच्यासमोर काय करावे, असा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. वेळेवर उपचार न मिळाल्यास येथे अनेकांना जीव गमवावा लागल्याचे वास्तव आहे.
हीच अवस्था वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयाची आहे. तेथे मंजूर तीन डॉक्टर पैकी तीन ही जागा रिक्त आहे. जि. प. अंतर्गत अल्लीपूर, कानगांव, बुरकोनीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील सहा पैकी पाच वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत.
जिल्हा सामान्य रुग्णालयात ३१ पदे
वर्धेलगत सावंगी येथील जवाहरलाल नेहरु वैद्यकीय महाविद्यालय व सेवाग्रामचे कस्तुरबा वैद्यकीय महाविद्यालय असताना जिल्हा रुग्णालयात ३१ डॉक्टर पूर्ण क्षमतेने रुग्ण सेवा देत आहे. त्यामुळे हिंगणघाटकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची भावना जनमानसात वाढत आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याची मागणी आहे.
हिंगणघाटचा बॅकलॉग भरावा
राज्यातील आत्महत्याग्रस्त १० जिल्ह्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी म्हणून ४१२ डॉक्टरांच्या एक महिन्यापूर्वी मुलाखती घेण्यात आल्या. ते शासनाकडून मिळणाऱ्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. यापैकी २६ डॉक्टर वर्धा जिल्ह्यासाठी मिळणार असल्याने अधिकाधिक वैद्यकीय अधिकारी हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालय व वडनेरच्या ग्रामीण रुग्णालयाला देण्याची मागणी आहे.