बांधकाम मंजुरीचा विषय ऐरणीवर
By Admin | Published: June 30, 2016 02:19 AM2016-06-30T02:19:22+5:302016-06-30T02:19:22+5:30
शहरालगतच्या अकरा ग्रा.पं. च्या हद्दीतील घर बांधकामासाठी परवानगी मिळविताना आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
बाईक रॅलीच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
वर्धा : शहरालगतच्या अकरा ग्रा.पं. च्या हद्दीतील घर बांधकामासाठी परवानगी मिळविताना आजही नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. कित्येक वर्षांपासून खोळंबलेल्या घर बांधकाम परवानग्या सुरू करण्यात आल्या; पण प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट असल्याने नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागते. याबाबत नियम शिथील करून जनतेला सहज परवानगी मिळावी म्हणून जन समुदाय मंचाद्वारे मोटारसाकल रॅली काढण्यात आली. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
रॅली सकाळी ११ वाजता आर्वी नाका येथून निघून शिवाजी चौक, बजाज चौक, आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली.
अकरा ग्रामपंचायतीच्या बांधकाम मंजुरीची प्रक्रिया नगर रचनाकार कार्यालयाकडे सोपविण्यात आली आहे. या कार्यालयाने गरजुंना नियमांच्या नावावर त्रास देणे सुरू केले आहे. एक हजार चौरस फुट क्षेत्रफळ असलेल्या एनएटीपी मंजूर ले-आऊट मधील प्लॉटधारकाला नगर रचनाकार कार्यालयाद्वारे बांधकाम मंजूरी दिली जात नाही. तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांनी मंजूर केलेल्या ले-आऊटमधील प्लॉटवर बांधकाम परवानगी दिली जात नाही. हे कोणत्या नियमांतर्गत केले जाते, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केल्यास उडवा-उडवीची उत्तरे दिली जातात. प्लॉटची किंमत शून्य समजून प्रकरण घर बांधणीसाठी विचारात घेतले जात नाही. अशा ले-आऊटमधील प्लॉट-धारकांना बँकाही कर्ज देत नाही. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालून जनतेला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी जन समुदाय मंचाद्वारे करण्यात आली आहे.
बाईक रॅली व निवेदन देताना मंचाचे सचिन खंडारे, संजय जाधव, प्रवीण काळे, विशाल ठेंगडी, संजय किनगावकर, दीपक चुटे, सुधाकर चामलाटे, मनोज गायकवाड, मनोज पांडे, छोटू धोपाडे, अनिल भिसे, आशिष भिसे, नामदेव भोयर, संजय भोयर, मनोज ढगे, राजू शेंदरे, नेहारे, लोंदासे यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.(कार्यालय प्रतिनिधी)