गारपिटग्रस्तांचा नुकसानीचा निधी त्वरित खात्यात जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2018 12:36 AM2018-03-09T00:36:48+5:302018-03-09T00:36:48+5:30
मागील महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत गारपीट झाले. या गारपिटीमुळे शेतकºयांच्या शेतपिके तथा फळपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे.
आॅनलाईन लोकमत
वर्धा : मागील महिन्यात जिल्ह्यात काही तालुक्यांत गारपीट झाले. या गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या शेतपिके तथा फळपिकांचे नुकसान झाले. या नुकसानीची भरपाई देण्यासाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला आहे. हा निधी त्वरित गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विषयावर आढावा सभा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, खातेप्रमुख उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चौधरी यांनी सेवाग्राम विकास आराखड्याच्या प्रथम टप्प्यात पाच कामे प्रगतिपथावर असून सभागृह, यात्रीनिवासची टाकी, संरक्षण भिंत, धाम नदीची एक बाजू तथा यात्री निवास येथील पार्किंगचे काम सुरू असल्याचे सांगितले.
यावर आयुक्तांनी मे २०१८ पर्यंत सदर कामे पूर्ण करण्याच्या सूचना केल्या. तिसºया टप्प्यातील कामाचा आराखडा तयार करण्यात आला असून यावर्षी ६० कोटी रुपये निधी देण्यात आला आहे. एकूण ८५ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याचे सांगितले. गौण खनिज, रेतीघाट आदींचा महसूल गोळा करून १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, विविध विभागांना देण्यात आलेले वृक्ष लागवड उद्दिष्ट पूर्ण करावे, स्वयंसेवी संस्थानी वृक्ष जोपासण्याची जबाबदारी घेत अशाच ठिकाणी वृक्ष लागवड करावी. वन विभागाने झुडपी जंगल जमिनीचा कलम ४ नुसार वृक्ष लागवडीकरिता वापर करावा अशाही सूचना त्यांनी दिल्या. शेतीपूरक अभियानांतर्गत मत्स्य उत्पादन, तलाव तेथे मासोळी, मच्छीयुक्त तलाव, फिशनर्सरी, बोटुकली निर्माण करणे, दुग्धव्यससाय, कुक्कुटपालन, चारा उत्पादन, रेशीम तुती लागवडीमध्ये वाढ करण्यासाठी संबंधित विभागांनी प्रयत्न करावे. जिल्ह्यात उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासणार नाही यासाठी केलेल्या उपाययोजनांची अनुपकुमार यांनी माहिती जाणून घेतली. जलयुक्त शिवार अभियान, धडक सिंचन विहिरीबाबतही आढावा घेण्यात आला.
मायक्रो एटीएमचा उपयोग करण्याचे आवाहन
मायक्रो एटीएम ही सुविधा घरपोच व गावात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही सेवा आधार लिंक असून यात कोणत्याही प्रकारची फसवणूक नाही. नागरिकांना थंबद्वारे व्यवहार करता येतात. ही सुविधा गावात व घरपोच उपलब्ध असल्याने नागरिकांना शहरात जाऊन आर्थिक व्यवहार करण्यासाठी वेळ व पैसा खर्च करण्याची गरज नाही. यासाठी नागरिकांनी मायक्रो एटीएम सेवेचा उपयोग करून लाभ घ्यावा, असे आवाहन सेलू तालुक्यातील बोरी येथे मायक्रो एटीएमच्या उद्घाटनप्रसंगी विभागीय आयुक्त अनुपकुमार यांनी केले.
जिल्हा नियोजन समिती व आयडीएफसी बँक तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जि.प. सीईओ अजय गुल्हाणे, तहसीलदार महेंद्र सोनोने, गटविकास अधिकारी संघमित्रा कोल्हे, देवकुमार कांबळे, नायब तहसीलदार श्याम कावटी, मनीष कावडे, हेमंत काकडे, मंडळ अधिकारी सायरे उपस्थित होते.
बँक सुविधा सुरळीत व्हावी, आपले आधार आपली बँक या सुविधेंतर्गत ही सेवा गावस्तरावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यात बँक खाते उघडणे, पैसे काढणे व भरणे, निराधार, विधवा, राजीव गांधी पेन्शन, शिष्यवृत्ती रक्कम काढणे आदी कामे केली जाते. यामुळे वेळ, श्रम व बुडणारी मजुरीची वाचेल, असेही अनुपकुमार यांनी सांगितले.