कर्जमाफी, बोंडअळीचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 09:49 PM2018-12-06T21:49:09+5:302018-12-06T21:49:47+5:30
शेतकरी कर्जमाफी ग्रीन लिस्टनुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ रक्कम जमा करण्यात यावे तसेच जिल्ह्यात बोंडअळीचे अनुदान चुकीने सस्पेन्स खात्यात गेलेल्या शेतकºयांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे.....
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : शेतकरी कर्जमाफी ग्रीन लिस्टनुसार अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ रक्कम जमा करण्यात यावे तसेच जिल्ह्यात बोंडअळीचे अनुदान चुकीने सस्पेन्स खात्यात गेलेल्या शेतकऱ्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती मिलिंद भेंडे यांनी मुंबई येथे मंत्रालयात राज्याचे वित्त नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.
भेंडे यांनी यासंदर्भात वित्त मंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेतंर्गत राज्यात कर्जमाफी केली. या कर्जमाफीच्या ग्रीनलिस्ट सर्व बॅँकांमध्ये लावण्यात आल्या. मात्र अजूनही अनेक शेतकऱ्यांना ग्रीनलिस्ट नुसार कर्जमाफीचे अनुदान खात्यात मिळालेले नाही. शेतकऱ्यांना पायपीट करावी लागत आहे. हे अनुदान तत्काळ खात्यात जमा करण्याबाबत निर्देश द्यावेत तसेच बोंडअळीचे अनुदान तांत्रीक चुकांमुळे शेतकऱ्यांचे खात्यात जाण्याऐवजी बॅँकांच्या सस्पेन्स अकाऊंटला जमा झाले आहे. ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर पालकमंत्री मुनगंटीवार यांनी तात्काळ जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना दुरध्वनीवरून या प्रश्नाकडे लक्ष घालावे, अशी सूचना केली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शासन गंभीर असून याबाबत बॅँकांनी हयगय करू नये. शेतकऱ्यांना तत्काळ अनुदान वितरीत करावे. शासनाकडून सर्व टप्प्यातील रक्कम जिल्ह्याला देण्यात आली आहे, अशी माहिती भेंडे यांना दिली. बोंडअळीचेही अनुदान जमा करण्याबाबत सूचना मुनगंटीवार यांनी केल्या. जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालण्याचे निर्देश त्यांनी दिले आहे.