निराधारांचे अनुदान तत्काळ जमा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 10:09 PM2019-07-11T22:09:05+5:302019-07-11T22:10:04+5:30
शासनाच्यो निराधार व गरीबांसाठी अनेक योजना आहे. परंतु दफ्तर दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे निराधारांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बैठक बोलावून निराधारांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात तत्काळ जमा करावे, असे निर्देश तहसीलदार सोनवणे यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घोराड : शासनाच्यो निराधार व गरीबांसाठी अनेक योजना आहे. परंतु दफ्तर दिरंगाईमुळे या योजनांचा लाभ लाभार्थ्यांना वेळेत मिळत नाही. त्यामुळे निराधारांना त्रास सहन करावा लागतो. याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच या वृत्ताची दखल घेत आमदार डॉ. पंकज भोयर यांनी बैठक बोलावून निराधारांचे अनुदान त्यांच्या बँक खात्यात तत्काळ जमा करावे, असे निर्देश तहसीलदार सोनवणे यांना दिले.
स्थानिक विश्रामृहात आमदार डॉ. पंकज भोयर यांनी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अनुदान संदर्भात बैठक घेतली. बैठकीला तहसीलदार सोनवणे, नायब तहसीलदार तीनघसे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष हरीश पारिसे, सदस्य तथा भाजप तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, रवींद्र शेळके, अशोक रतनवार, मोहन मसराम, ज्योती सुर्वे, विश्वेश्वर खोबे, राजू उडाण, वामन चौधरी, विजय खोडे आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार डॉ. भोयर यांनी संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेचा आढावा घेतला. दोन्ही योजनांचे अनुदान राज्य शासनाकडून प्राप्त झाले असताना अद्याप अनुदानाचे वाटप झाले नसल्याबाबत विचारणा केली. तहसीलदारांनी या योजनांचे देयक तयार करण्याचे कार्य सुरू असून काही देयक कोषागारात येत्या दोन दिवसांत पाठविण्यात येईल, असे सांगितले. अनुदानाचे वाटप करताना कुठल्याही प्रकारची कुचराई न करता तत्काळ प्रत्येक लाभार्थ्याच्या खात्यात रक्कम करा तसेच संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजना, वृद्धापकाळ योजना, रेशनकार्ड व वर्ग २ च्या शेतजमिनी वर्ग १ मध्ये करण्यासाठी तातडीने शिबिर घेण्यात यावे, असे निर्देश दिले. त्यानुसार तहसीलदार सोनवणे यांनी १६ जुलैला सेलू, १९ ला हिंगणी, २२ ला केळझर, २५ ला येळाकेळी तर २७ ला झडशी येथे शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगितले.