गौणखनिज माफिया सुसाट; महसूल विभागाचे हातावर हात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 03:30 PM2023-08-11T15:30:49+5:302023-08-11T15:34:47+5:30
झाडगाव शिवारातील टेकडी पोखरली : येळाकेळी-पांढरकवडा परिसरातूनही अवैध उत्खनन जोरात, कारवाईकडे कानाडोळा
वर्धा : उपविभागामध्ये गौणखनिज माफिया चांगलेच सैराट झाले आहे. त्यांना प्रशासनातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याने या गौणखनिज चोरट्यांनी अख्ख्या टेकड्या पोखरून मोठमोठे खड्डे तयार केले आहे. शहरालगतच्या झाडगाव शिवारातील अख्खी टेकडीच अवैधरीत्या पोखरली असून येळाकेळी परिसरातही हीच परिस्थिती असून कारवाई होत नसल्याने महसूल विभागाचे हातावर हात का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
तालुक्यातील झाडगाव शिवारातून गेलेल्या समृद्धी महामार्गापासून महामार्गाच्या बोगद्यातून टेकडीकडे रस्ता गेला आहे. या रस्त्याने अवैधरीत्या मुरूमाची वाहतूक करणारी वाहने धावत असतात. सायंकाळपासून मशीनच्या साहाय्याने टेकडी पोखरून ढीग मारले जातात आणि त्यानंतर मुरूमाची वाहतूक केली जाते. असा प्रकार बऱ्याच दिवसांपासून दिवसाढवळ्या सुरू असून या मुरूम चोरट्याने अख्खी टेकडीच पोखरून टाकली आहे. इतकेच नाही तर आजूबाजूचे शेतही पोखरून मोठे खड्डे तयार केल्याने परिसरातील शेतकऱ्यांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. या शिवारातून या गौणखनिज चोरट्याने हजारो ब्रासचे अवैधरीत्या उत्खनन केले आहे. याशिवाय येळाकेळी येथेही रात्रीला मशीनच्या साहाय्याने मुरूम पोखरून दिवसभर अवैधरीत्या मुरूमाची वाहतूक केली जात आहे. यामुळे या शिवारांमध्ये मोठमोठे जीवघेणे खड्डे तयार झाले असून यातून शासनाच्या महसुलाची लूट चालविली असतानाही प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर झापड
वर्धा तालुक्यातील झाडगाव शिवारात आणि सेलू तालुक्यातील येळाकेळी शिवारात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मुरूमाचे उत्खनन करून टेकड्या भुईसपाट करण्याचा सपाटा लावला आहे. या गौण खनिजाचे रक्षण करण्याची जबाबदारी तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांची आहे; पण त्यांच्या हद्दीत डोळ्यादेखत मुरूमाची चोरी होत असताना तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांच्या डोळ्यावर झापड का, असा प्रश्न असून त्यांच्याच सहकार्याने हा प्रकार सुरू असल्याचे दिसून येत आहे.
टेकडी पोखरणाऱ्यांचा शोध घेणार का?
झाडगाव आणि येळाकेळी या शिवारामध्ये कोण अवैधरीत्या गौणखनिजाचे उत्खनन करीत आहे. याची माहिती तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांना नसेल, हे शक्य नाही. त्यामुळे हजारो ब्रास मुरूमाचे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्या या मुरूम चोरट्यांचा शोध घेऊन काय कारवाई करण्याचे धाडस महसूल विभाग दाखवणार का, याकडे लक्ष लागले आहे.
तहसीलदार म्हणतात, कारवाई करणार
अवैधरीत्या गौण खनिजाचे उत्खनन आणि वाहतूक करीत असल्यास त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल. आता झाडगाव येथील प्रकरणातही सखोल माहिती घेऊन तसेच मौका चौकशी करून अवैध उत्खनन केलेल्यावर कारवाई केली जाईल.
- रमेश कोळपे, तहसीलदार, वर्धा.
येळाकेळी परिसरावर विशेष लक्ष असून त्या ठिकाणी अधूनमधून भेट दिली जाते. नुकताच काही दिवसांपूर्वी या ठिकाणी कारवाई करून वाहनांना दंडही आकारला; पण अजूनही अवैध उत्खनन सुरू असेल तर योग्य ती कारवाई केली जाईल.
- डॉ. स्वप्निल सोनवणे, तहसीलदार, सेलू