पूरपीडितांना पट्ट्यांची दुय्यम प्रत मिळावी
By admin | Published: May 27, 2017 12:33 AM2017-05-27T00:33:36+5:302017-05-27T00:33:36+5:30
शहरात १९७९ मध्ये आलेल्या महापुरातील प्रभावीत नागरिकांना शासनाकडून पट्टे देण्यात आले.
मागणी : पट्टेधारकांच्या प्रती झाल्या गहाळ
लोकमत न्यूज नेटवर्क
हिंगणघाट : शहरात १९७९ मध्ये आलेल्या महापुरातील प्रभावीत नागरिकांना शासनाकडून पट्टे देण्यात आले. शासनाने येथील रहिवाशांना पट्टे हस्तांतरीत केले. याला बराच कालावधी झाला असून काही पट्टेधारकांची हस्तांतरणाची प्रत गाहाळ झाली आहे. त्यामुळे या नागरिकांना नव्याने पट्ट्याची दुय्यम प्रत देण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे.
नगरसेवक प्रकाश राऊत यांच्या नेतृत्त्वात तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. हिंगणघाट शहरामध्ये सन १९७९ मध्ये महापूर आला होता. नदीकाठच्या लोकांची घरे पुरात वाहल्यामुळे त्या भागातील नागरिकांना पुरपिडीत म्हणून घोषित करण्यात आले होते. त्यांना पुरपिडीत वसाहतीत भूखंड देण्यात आले. तर काही पुरपिडीतांना गोमाजी वार्ड, शास्त्री वार्ड, इंदिरा गांधी वॉर्ड, तुकडोजी वॉर्ड येथे भूखंड देण्यात आले होते. मात्र यामध्ये ज्या नागरिकांना भूखंडासंदर्भात पट्टे देण्यात आले होते. हे पट्टे देण्यास बराच कालावधी लोटला आहे.
यात येथील काही रहिवाशांची पट्टे मिळाल्याबाबतची प्रत गहाळ झालेली आहे. ज्या नागरिकांचे पट्टे गहाळ झाले आहे अशा नागरिकांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकूल मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांना पट्ट्यांच्या प्रतीची अत्यंत आवश्यकता आहे. तहसील कार्यालयाच्यावतीने या पट्टेधारकांना नव्याने दुय्यम प्रत दिल्यास त्यांची अडचण दूर होईल, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
याकरिता ज्या नागरिकांचे पट्टे गहाळ झाले आहे त्यांना त्वरीत त्यांच्या पट्ट्यांची दुय्यम प्रत उपलब्ध करून द्यावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले. यावेळी नगरसेविका पद्मा कोडापे, प्रकाश राऊत तसेच शीतल रॉय, पुष्पा भोयर, तानाबाई कुमरे, चंदा कुमरे, रमेश जुमनाके, संगीता तोडासे, सिंधु बिजवार, सुमन कोडापे, सुरेश जुमनाके, विनोद घुबडे, दुर्गा तोडासे आदींची उपस्थिती होती.
शासकीय योजनांचा लाभ घेताना येतो व्यत्यय
येथील काही रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये घरकूल मंजूर करण्यात आले आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता त्यांना पट्ट्यांच्या प्रतीची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र लाभार्थ्यांची पट्टे मिळाल्याबाबतची प्रत गहाळ झालेली आहे. ज्या नागरिकांचे पट्टे मिळाल्याची प्रत गहाळ झाली त्यांना दुय्यम प्रत दिल्यास शासकीय योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर ठरू शकते. त्यामुळे या मागणीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.