वनवा पेटला; दोन एकरांतील उसाचा कोळसा, तीन लाखांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 03:52 PM2022-03-16T15:52:28+5:302022-03-16T18:34:02+5:30
वनवा पेट घेत ही आग शेतात पोहोचल्याने दोन एकरांतील ऊस पूर्णत: जळून खाक झाला.
वडनेर (वर्धा) : सध्या शेतकरी उन्हाळवाहीच्या कामांना गती देत असतानाच वनवा पेट घेत ही आग शेतात पोहोचल्याने दोन एकरांतील ऊस पूर्णत: जळून खाक झाला. शिवाय शेतातील शेतीउपयोगी साहित्याचाही कोळसा झाल्याने दोन शेतकऱ्यांचे तीन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना नजीकच्या टाकळी (निधी) शिवारात घडली असून, बुधवारी सकाळी उघडकीस आली.
टाकळी (निधा) येथील शेतकरी दिलीप उत्तम लोंढे यांनी चार एकरांत ऊस पिकाची लागवड केली. पिकाची योग्य निगा राखल्याने उसाची वाढही बऱ्यापैकी झाली. ऊस तोडणीअंती किमान अडीच लाखांचे उत्पन्न होईल अशी आशा असतानाच वन वनव्याची आग शेतापर्यंत येत दोन एकरांतील संपूर्ण ऊस, तसेच शेतातील स्प्रिंकलर पाइप जळाल्याने दिलीप लोंढे यांचे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे.
याच आगीत राजू लोंढे यांच्या शेतातील स्प्रिंकलर पाइप आणि इतर शेतीउपयोगी साहित्य जवळाल्याने त्यांचे ५० हजारांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असून हवालदिल शेतकऱ्यांना शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.