आत्महत्या ही मनोसामाजिक आणि जैविक घटना
By admin | Published: February 8, 2017 12:45 AM2017-02-08T00:45:50+5:302017-02-08T00:45:50+5:30
आत्महत्या ही अचानक होत नाही. ती मनोसामाजिक घटनेसोबतच जैविक व जनुकीयसुद्धा आहे.
प्रवीण खैरकार : ‘सामाजिक विघटनातून युवकांच्या वाढत्या आत्महत्या’ विषयावर चर्चासत्र
सेवाग्राम : आत्महत्या ही अचानक होत नाही. ती मनोसामाजिक घटनेसोबतच जैविक व जनुकीयसुद्धा आहे. यामुळे आत्महत्या करण्यापूर्वी व्यक्तीच्या ठायी विविध तऱ्हेची लक्षणे दिसतात. एकदा का त्याच्या मेंदूत या तऱ्हेचा विचार आला तर त्या अनुषंगाने त्याच्या वर्तनात, विचारात आणि व्यवहारात बदल होत जातो आणि व्यक्ती स्वत:ला संपवायला लागतो, असे मत डॉ. प्रवीण खैरकार यांनी व्यक्त केले.
‘युवकांतील वाढत्या आत्महत्या’ हा चिंतेचा विषय आहे. सेवाग्राम परिसरात गत दोन वर्षांत १५ ते २२ वर्षांच्या युवकांनी केलेल्या आत्महत्या या अनुषंगाने नई तालीम समितीतर्फे चर्चासत्र घेण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
डॉ. खैरकार यांनी ‘दुर्खीम’ने केलेल्या चार वर्गीकरणाचा आधार घेत व जगभरातील आत्महत्येच्या अनुषंगाने झालेल्या संशोधनाच्या आधारे त्यांनी मेंदूची केंद्र व त्यातील नुरोन्सच्या कार्यपद्धती समजावून सांगितल्या. यात झालेल्या असंतुलनामुळे व्यक्ती आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतो. याचा विचार करून तो त्यानुसार यंत्रणा निर्माण करतो व शेवटच्या क्षणी निर्णय ेघेतो, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मानसोपचार विभागाच्या डॉ. स्रेहा, डॉ. राजेश, डॉ. विनय, डॉ. स्वाती, डॉ. गिरीष व डॉ. विवेक यांनी आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची १० लक्षणे व उपाय यावर विस्ताराने विवेचन केले. चर्चासत्राला सेवाग्राम गावातील १६५ महिला व पुरूष उपस्थित होते. यातच ज्यांच्या घरी आत्महत्या झाल्या ते पाच कुटुंबही उपस्थित होते. प्रास्ताविक करीत भूमिका, औचित्य व वैद्यकीय संकल्पना समजाविण्याचे कार्य डॉ. सुगन बरंठ यांनी केले. संचालन करीत आभार नई तालीमचे प्रभाकर पुसदकर यांनी मानले.
कार्यक्रमाला आनंद निकेतनचे सुषमा शर्मा व शिक्षक, सेवाग्रामच्या सरपंच रोशना जामलेकर, नारायण देवतळे, गीता कुमारे, अॅड. अशोक गांजरे, रोहित मेश्राम, किशोर भोयर, सुंदरा धाबर्डे, मंगन संग्रहलयाच्या भावना डगवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉ. शिवचरण ठाकूर, संदीप भगत, रूपेश कडू, विनय करूळे, पवन भाई व युवकांनी सहकार्य केले.(वार्ताहर)