आत्महत्या प्रकरणात महिनाभरानंतर गुन्हा दाखल
By Admin | Published: July 2, 2017 01:07 AM2017-07-02T01:07:01+5:302017-07-02T01:07:01+5:30
मुलाच्या शिक्षणासाठी गहाण ठेवलेली दुचाकी परत द्यावी म्हणून विनंती केली असता जादा पैशाची मागणी केली.
कर्ज फेडण्याच्या तगाद्याने रेल्वेसमोर आत्महत्या
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : मुलाच्या शिक्षणासाठी गहाण ठेवलेली दुचाकी परत द्यावी म्हणून विनंती केली असता जादा पैशाची मागणी केली. यामुळे पुलगाव येथील मनोज पाटील यांनी दहेगाव (स्टे.) रेल्वेस्थानक परिसरात रेल्वेगाडीसमोर येत आत्महत्या केली. ही घटना १० मे रोजी घडली. या प्रकरणी तब्बल एक महिन्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यातही सावकारी कायद्यानुसार गुन्हे दाखल केले नसल्याने पोलीस तपासावरच प्रश्नचिन्ह लागले आहे.
रेल्वे पोलिसांनी तपास करीत मनोजजवळ मिळालेल्या चिठ्ठीवरून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल न करता टाळाटाळ केली. महिनाभराच्या कालावधीनंतर पुलगाव पोलिसांत १७ जून रोजी गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होऊन कालावधी लोटला; पण आरोपीला अटक केली नाही. जवाहर कॉलनी येथील मनोज पाटील यांनी काही कामानिमित्त नितीन गुप्ता याच्याकडून ६ टक्के व्याजाने २० हजार रुपये घेतले होते. पैशाच्या मोबदल्यात गुप्ताने त्यांची दुचाकी गहाण ठेवली होती. गाडीचे कागदपत्र व कोरा धनादेशही घेतला. काही दिवसांनी त्यांनी २५ हजार रुपये परत केले; पण गुप्ता याने अधिक पैशाची मागणी करून दुचाकी देण्यास नकार दिला. मनोजने गुप्ताला विनंती केली; पण त्याने दुचाकी दिली नाही. याच चिंतेत मनोजने रेल्वेखाली येत आत्महत्या केली. जाचामुळे आत्महत्या केल्याचे स्पष्ट असताना गुन्हा का दाखल करण्यास विलंब का, हा प्रश्नच आहे. अद्याप आरोपी मोकाट असून मनोजचे कुटुंब उघड्यावर आले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देत न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
चिठ्ठीत काय होते
रेल्वे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी पंचनामा केला असता मनोजच्या खिशात चिठ्ठी मिळाली. त्यात ‘मी नितीन गुप्ता याच्याकडून ६ टक्के व्याजाने २० हजार रुपये घेतले होते. त्या मोबदल्यात त्याने माझी दुचाकी गहाण ठेवली होती. मी त्याला ९ आॅक्टोबर २०१६ रोजी ५ हजार, १७ फेब्रुवारी रोजी १० हजार व ९ मे रोजी १० हजार असे २५ हजार रुपये परत केले. मी गाडी परत मागितली असता त्याने नकार देत ३२ हजार रुपये झाल्याचे सांगितले. मुलाच्या शिक्षणाला गाडी पाहिजे असून एवढे पैसे देण्याची ऐपत नाही. यामुळे मी आत्महत्या करीत असून याला नितीन गुप्ता जबाबदार आहे’, असे नमूद केले आहे.