‘जलयुक्त’ ठरतेय वन्यप्राण्यांसाठी ‘उपयुक्त’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:51 PM2018-12-16T22:51:59+5:302018-12-16T22:52:15+5:30
पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवाचे अस्तीत्व कायम राहणे गरजेचे आहे. परंतु नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांनी तळ गाठल्यावर वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते.
महेश सायखेडे।
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून पृथ्वी तलावरील प्रत्येक सजीवाचे अस्तीत्व कायम राहणे गरजेचे आहे. परंतु नैसर्गिक पाण्याच्या स्त्रोतांनी तळ गाठल्यावर वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. वन्य प्राण्यांची हिच तृष्णा तृप्तीसाठी होणारी भटकंती थांबावी या उद्देशाने जिल्ह्यातील जंगल परिसरात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सन २०१७-१८ या कालावधीत १७१ पाणी साठवण तलाव बांधण्यात आले आहे. समाधानकारक पावसाअभावी दुष्काळाचे सावट असलेल्या वर्धा जिल्ह्यातील वन्य प्राण्यांसाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत झालेले हे काम सध्या उपयुक्तच ठरत आहे.
सध्या जल संकटाच्या झळा गावांमध्ये नागरिकांना सोसाव्या लागत आहेत. परंतु, यंदा जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न होताही जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून झालेले विविध जलसंवर्धनाच्या कामांमुळे सध्या जंगलात वन्यप्राण्यांसाठी मुबलक पाणी असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. यंदाच्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने डिसेंबर महिन्याच्या पूर्वीच वन्य प्राणी पाण्याच्या शोधार्थ गावांकडे आपला मोर्चा वळवतील अशी शक्यता होती. मात्र, जलयुक्त योजनेच्या माध्यमातून झालेल्या कामांमुळे जंगल परिसरातच सध्या पाणी उपलब्ध असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या पाहणीत पुढे आले आहे. असे असले तरी फेब्रुवारी महिन्यांच्या सुरूवातीला वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होऊ शकते असे तज्ज्ञांचे म्हणजे आहे. त्यामुळे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुन्या कृत्रिम पानवट्यांची दुरूस्ती व काही नवीन पानवटे तयार करून तेथे पाणी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यास सुरूवात केली आहे. त्याच्या आराखड्याला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अंतीम स्वरूप मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
२०१८-१९ साठी २९२ कामे मंजूर
सन २०२८-१९ करिता जलयुक्त शिवार योजनेंतर्गत ६३ खोल समपातळी चर खोदणे, ७६ वन्यप्राणी पाणी साठवण तलाव, ४१ नाला खोलीकरण, चार तलावांमधील गाळ काढणे, सहा गुरे प्रतिबंधक चर खोदणे, ६० गॅबीयन तर ४२ दगडी बांध तयार करण्याच्या कामांना मंजूरी मिळाली आहे. त्यापैकी खोल समपातळी चर खोदण्याच्या चार कामांना हाती घेवून दोन कामे पूर्ण करण्यात आली आहे. तर उर्वरित दोन कामे प्रगतीपथावर आहेत. शिवाय वन्यप्राणी पाणी साठवण तलाव तयार करण्याची एकूण पाच कामे हाती घेत दोन कामे पूर्ण करून तीन कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले.
४१७ कामे झाली पूर्ण
सन २०१७-१८ या कालावधीतील वन विभागाने जलयुक्त शिवार योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात कामे केली आहेत. यात १२३ खोल समपातळी चर खोदणे, १७१ वन्यप्राणी पाणी साठवण तलाव, ८० नाला खोलीकरण, ९ गुरे प्रतिबंधक चर खोदणे, २४ गॅबीयन, १० दगडी बांध बांधण्यात आले आहेत.
उन्हाळ्याच्या दिवसात वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. जिल्ह्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने उन्हाळ्याची परिस्थिती यंदा हिवाळ्याच्या दिवसातच ओढावण्याची शक्यता होती. परंतु, जलयुक्तच्या कामांमुळे जंगलातील अनेक नैसर्गीक पाण्याच्या स्त्रोतांमध्ये सध्या मुबलक पाणी आहे. असे असले तरी फेब्रुवारी महिन्यांच्या सुरूवातीला जंगलातील अनेक नैसर्गिक पानवटे आटतील. त्यावेळी कृत्रिम पानवट्यांचा आधार वन्य प्राण्यांना राहणार आहे. त्यासाठीच्या कामांच्या आराखड्याला डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अंतीम रुप दिले जाईल.
- सुहास बढेकर, सहाय्यक वनरक्षक, वर्धा.