गांधी विचार सरणी आणि चेतना विकास संस्थेच्या सुमन बंग यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:02 PM2021-05-03T16:02:07+5:302021-05-03T16:13:29+5:30
जेष्ठ गांधी विचार सरणीच्या, भूदान चळवळीसह संपूर्ण क्रांती आंदोलनात सक्रिय सहभागी आणि चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात गांधीजींच्या विचारांवर महिलांसाठी प्रक्षिणासह समुपदेशनाचे कार्य करणाऱ्या सुमन ठाकुरदास बंग यांचे कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी निधन झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सेवाग्राम : जेष्ठ गांधी विचार सरणीच्या,भूदान चळवळीसह संपूर्ण क्रांती आंदोलनात सक्रिय सहभागी आणि चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण क्षेत्रात गांधीजींच्या विचारांवर महिलांसाठी प्रक्षिणासह समुपदेशनाचे कार्य करणाऱ्या सुमन ठाकुरदास बंग यांचे कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी निधन झाले. त्या ९६ वर्षाच्या होत्या.त्यांना सामाजिक क्षेत्रात सुमनताई अशीच ओळख होती.
सुमनताई यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथे ५ मे १९२५ मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव सुंदराबाई तर वडील गंगाधर मानपुरे होते. बालवयातच त्यांना कष्ठ करण्याची सवय आणि प्रेरणास्थान आईच राहिली आहे. मुंबईत वैद्यकिय शिक्षण घेत असताना प्रा.ठाकुरदास बंग यांच्याशी विवाह झाल्याने शिक्षण सोडून वर्धेत आल्या. वर्धेत आल्यावर आणि प्रा..ठाकुरदास बंग यांच्या मित्र परिवार व कार्यामुळे जीवनच बदलून गेले. त्यांना गांधी विचारांचे आकर्षक होते पण या ठिकाणी प्रत्यक्ष कार्याच्या रूपाने काम करायला व पाहायला मिळाले हे विशेष.
ठाकुरदास यांच्या सोबत सर्वप्रथम बरबडी नंतर महाकाळ गावात राहून काम करू लागल्या. तिथे साधना सधन संस्थेच्या माध्यमातून स्वावलंबी सामुहिक प्रयोग सुरू केला. याच दरम्यान त्यांनी मॅट्रिक ची परीक्षा उत्तीर्ण करून पुढे एम.ए.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला सुरूवात झाली. दोघाही पतीपत्नीने गावागावात जाऊन जमीन मागितली. उदार भावनेतून जमीन मिळाली. नंतर प्रा.ठाकुरदास बंग सहभागी झाले. नंतर दोघेही आचार्य विनोबा भावे यांच्या सूचनेनुसार ते बिहारला गेले. ग्रामदानच्या कामात ते सक्रिय सहभागी झाले. याच दरम्यान साधना सदनचे काम बंद करून त्या मुलांसोबत वर्धेतील महिला आश्रमात राहून शिक्षणाचे काम करू लागल्या. गांधीजींचे भाषण ऐकले, विचार समजावून घेतले मात्र प्रत्यक्ष भेट होऊ शकली नाही. आश्रम जीवन पध्दतीचे संस्कार त्यांच्या दोन्ही अशोक व डॉ अभय बंग या मुलांना दिले.
१९७० मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांती आंदोलनात सहभागी झाल्या. दोनदा सुमनताई यांना तुरूंगवास झाला. कामाचा प्रत्यक्ष दीर्घ अनुभव असल्याने वर्धेत चेतना विकास संस्थेच्या माध्यमातून काम सुरू केले. यातून बाल कल्यान व महिला सशक्तीकरण चे काम सुरू केले. बचत गट, समुपदेशन यातून संस्थेचा पसारा वाढला. ग्रामीण भागातील महिलांसाठी चेतना विकास मैलाचा दगड ठरला. जवळपास १२५ गावात काम सुरू आहे.
गांधीजींच्या विचारांची प्रेरणा घेऊन सुमनताई यांनी संस्थेच्या माध्यमातून आपले कार्य अखंड सुरू ठेवले होते. त्या वृध्द असल्या तरी कामालाच सदैव प्राधान्य देऊन ग्रामिण महिलांसाठी अविरत झटणाऱ्या सुमनताई यांनी अखेरचा श्वास कस्तुरबा रुग्णालयात वयाच्या ९६ व्या वर्षी घेतला. त्या आलोडी येथील शेतावरील घरी राहात होत्या.