सूर्यफूल लागवड ठरतेय उत्पन्नाचे नवे साधन

By Admin | Updated: May 16, 2015 02:16 IST2015-05-16T02:16:01+5:302015-05-16T02:16:01+5:30

सूर्यफुलाचे पीक हे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीनही हंगामात घेता येते.

Sunflower planting means new sources of income | सूर्यफूल लागवड ठरतेय उत्पन्नाचे नवे साधन

सूर्यफूल लागवड ठरतेय उत्पन्नाचे नवे साधन


वर्धा : सूर्यफुलाचे पीक हे खरीप, रबी व उन्हाळी अशा तीनही हंगामात घेता येते. यामुळे दुष्काळ व नापिकीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना हे पीक उत्पन्नाचे नवे साधन ठरत आहे. याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन केल्यास मधविक्रीतून आर्थिक उत्पन्न मिळते. ही बाब हेरुन जिल्हातील काही भागात सूर्यफुलाची लागवड केली जात आहे.
सूर्यफुलाच्या एकूण लागवडीपैकी ४० टक्के लागवड खरीप तर ६ टक्के लागवड रबी व उन्हाळी हंगामात केली जाते. सूर्यफुलाची बागायतीखाली लागवड केल्यास अधिक उत्पादन मिळते. सूर्यफुलाच्या तेलाचे आहारातील महत्त्व तसेच बाजारातील मागणी व मिळणाऱ्या किंमत पाहता सूर्यफूल पिकांखालील क्षेत्रात उत्पादकतेत वाढ करणे गरजेचे असल्याचे कृषितज्ज्ञ म्हणतात. सूर्यफूल हे पीक साधारणत: ८० ते १०० दिवसात येत असते. बहुविध दुबार पीक, क्रमिक पीक व आंतर पीक पद्धतीस योग्य व कमी पाण्यावर येणारे हे पीक आहे. पाण्याचा ताण सहन करीत कमी लागवड खर्च असतो. यामुळे सूर्यफुलाची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी हिताचे ठरत आहे. बी-बियाण्यांची योग्य तपासणी करून लागवड केल्यास यासह प्रतिहेक्टरी रोपांची संख्या योग्य राखणे, हलक्या व कमी प्रतिच्या जमिनीत लागवड न करणे, वेळीच व योग्य प्रकारच्या कीड व रोगांचा प्रादुर्भाव नष्ट करणे, उन्हाळी सूर्यफुलास जमिनीच्या मुबलकतेनुसार पाणी देणे या बाबींची खबरदारी घेतल्यास चांगले उत्पन्न मिळते. शिवाय याला जोडधंदा म्हणून मधुमक्षिका पालन करता येणे शक्य आहे. सूर्यफुलात परागीकरणासाठी मधमाश्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो.
यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी या सूर्यफूल लागवडीचा प्रयोग केला असून यातून नवे उत्पन्नाचे साधन ठरत असल्याचे दिसत आहे.(स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Sunflower planting means new sources of income

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.