सनशाईन कॉन्व्हेंटने दिली विद्यार्थ्याला टिसी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 12:14 AM2018-07-14T00:14:12+5:302018-07-14T00:15:03+5:30
सनशाईन कॉन्व्हेंट, सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार विनंती करुनही शाळा सोडल्याचा दाखला न देण्याच्या मुद्याची गंभीर दखल घेत जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी शुक्रवारी कॉन्व्हेंटमध्ये जावून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला तत्काळ टिसी मिळवून दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वर्धा : सनशाईन कॉन्व्हेंट, सेवाग्राम येथील विद्यार्थ्यांच्या पालकांनी वारंवार विनंती करुनही शाळा सोडल्याचा दाखला न देण्याच्या मुद्याची गंभीर दखल घेत जि. प. अध्यक्ष नितीन मडावी यांनी शुक्रवारी कॉन्व्हेंटमध्ये जावून संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाला तत्काळ टिसी मिळवून दिली. यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी कानवडे, गटशिक्षणाधिकारी संजय पाटील, शिक्षण विस्तार अधिकारी हजारे, खिराळे, संगीता महाकाळकर या आदी उपस्थित होते. सनशाईन कॉन्व्हेंटच्या मोहम्मद जियाऊल मोहम्मद वजीऊल कुरेशी या विद्यार्थ्यास शाळा सोडण्याचा दाखला देण्यात येत नसल्याबाबतचे वृत्त लोकमतमध्ये १२ जुलै रोजी प्रसिद्ध झाले होते. या वृत्ताची दखल घेवून जि.प. अध्यक्षांनी शाळेचे सचिव व मुख्याध्यापक यांना याबाबत विचारना केली. संस्थेच्या मुख्याध्यापकांनी फी न भरल्याबाबतची सबब पुढे केली. तसेच संस्थेचे सचिव यांनी सदर कॉन्व्हेंटला मान्यता असल्याची बाब अध्यक्षासमोर सांगितली. कोणतेही पालक आपल्या पाल्याचा शाळा सोडण्याबाबतचा दाखला मागण्यास आले तर तो वेळीच देणे ही शाळेची जबाबदारी असल्याचे यावेळी अध्यक्षांनी सांगितले. कोणत्याही परिस्थितीत बालकांचे शैक्षणिक भवितव्य टांगणीला लावता येणार नाही असे स्पष्ट बजावून सांगितले. त्यानंतर प्रशासनाने सदर विद्यार्थ्यास शाळा सोडल्याचा दाखला प्रदान केला.