पुरवठा विभागाचा भोंगळ कारभार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 09:43 PM2019-06-27T21:43:35+5:302019-06-27T21:44:21+5:30
येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग बेताल व भोंगळ कारभाराने चर्चेत आहे. तळेगाव येथील दोन्ही लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेवर एकच आरसी क्रमांक नमूद करीत धान्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे.
अमोल सोटे।
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी (शहीद) : येथील तहसील कार्यालयातील पुरवठा विभाग बेताल व भोंगळ कारभाराने चर्चेत आहे. तळेगाव येथील दोन्ही लाभार्थ्यांच्या शिधापत्रिकेवर एकच आरसी क्रमांक नमूद करीत धान्यापासून वंचित ठेवण्यात आले आहे. या लाभार्थ्यांनी दोन महिन्यांपासून चकरा मारून थकल्यावर थेट जिल्हाधिकाऱ्यांचे दार ठोठावले आहे. गरीब कुटुंबात जन्मलो हाच आमचा गुन्हा झाला का? असा सवाल या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे.
तळेगाव येथील स्मिता विनोद भोजने यांच्या अनुक्रमांक ८८६९६५ आणि देवराव सदुजी गाडगे याच्या कार्ड क्रमांक १०२४८६० वर आरसी क्रमांक २७२००५६९५४६३ दिला आहे. भोजने यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांनी स्वस्त धान्य दुकानाराकडे विनोद भोजने, सर्वेश भोजने व पूर्वेश भोजने या तिघांच्या नावे धान्य देण्याची मागणी केली; मात्र दुकानदाराने हात झटकत तहसील कार्यालयात जाण्याचा सल्ला दिला. स्मिता भोजने, गाडगे या दोन्ही रेशनकार्डधारकांना पुरवठा विभागाकडून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. येथील पुरवठा निरीक्षकाने मनमानी कारभार सुरू केल्याचा आरोप शिधापत्रिकाधारकांनी केला आहे.
मागील दोन महिन्यांपासून धान्य मिळणे बंद झाल्यावर लाभार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत व्यथा मांडली. जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकाºयांना सूचना दिल्या आहे. आष्टीच्या तहसीलदारांनी मुजोर अधिकाऱ्यांवर कारवाई करून वंचित ग्राहकांना स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याची कारवाई करण्याची मागणी गाडगे व भोजने कुटुंबीयांनी केली आहे.
अनेक शिधापत्रिकांवर गोंधळ
तळेगावसारखा गोंधळ असंख्य शिधापत्रिकेत आहे. धान्य दुकानदार आणि पुरवठा विभाग या दोन्ही ठिकाणी आरसी क्रमांकाचे रजिस्टर असणे क्रमप्राप्त आहे. असे असताना एकच क्रमांक दोन लाभार्थ्यांना देणे म्हणजे ‘आंधळं दळते आणि कुत्रं पीठ खाते’, असा पुरवठा विभागाचा कारभार झाला आहे.
दुकानदारांची अरेरावी
शिधापत्रिकेतील चुका दुरूस्ती करण्याची कारवाई दुकानदारामार्फत करावी लागते. मात्र, दुकानदार ग्राहकांची बोळवण करून वेठीस धरत आहे. सामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयाच्या येरझारा करून मजुरी बुडवावी लागत आहे. अधिकारी मुजोरीच्या भूमिकेत वावरत आहेत.
एका शिधापत्रिकेवर एकच आर.सी. क्रमांक द्यायला पाहिजे. चुकीचे काम करणाºया पुरवठा विभागातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
विवेक भिमनवार, जिल्हाधिकारी, वर्धा