स्वस्त धान्य दुकानातून साखरेचा पुरवठा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 12:31 AM2017-09-27T00:31:03+5:302017-09-27T00:31:14+5:30
ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
आर्वी : ऐन सणांच्या दिवसांत रेशन दुकानांतील साखर बेपत्ता झाली आहे. गरीब नागरिकांना खुल्या बाजारातून महागडी साखर खरेदी करणे शक्य नाही. परिणामी, गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी सण साजरा करता येणार नाही. शासन, प्रशासनाने स्वस्त धान्य दुकानात साखर उपलब्ध करून देत ती गोरगरीबांपर्यंत पोहोचवावी, अशी मागणी शिधापत्रिका धारक नागरिकांकडून करण्यात आली आहे.
मुख्य सणांच्या दिवसांत बिपीएल कार्ड धारकांची साखर बंद करण्यात आली आहे. केवळ अंत्योदय कार्ड धारकांना साखर देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हा निर्णय चुकीचा तथा बीपीएल कार्डधारकांवर अन्याय करणारा आहे. यामुळे अनेक गरीब नागरिकांना दसरा, दिवाळी हे सण साखरेअभावी साजरे करणे कठीण होणार आहे. यामुळे सर्वच कार्ड धारकांना साखर देण्यात यावी, अशी मागणी होत आहे. अनेक बीपीएल कार्ड धारकांच्या शिधापत्रिकांवर अद्याप बिपीएलचा शिक्का मारलेला नाही. यामुळे खरे गरजू बिपीएलच्या धान्यापासून वंचित राहत आहेत. त्यांच्या कार्डवर शिक्का मारण्यासाठी नव्याने सर्वेक्षण करून गरजू लाभार्थ्यांना दारिद्र रेषेखालील यादीत सामावून घ्यावे. यामुळे विधवा, परित्यक्त्या महिला यांना निराधार योजनेचे लाभ घेणे सोईस्कर होऊ शकणार आहे. केसरी कार्ड धारकांना मागील तीन वर्षांपासून धान्य देणे बंद करण्यात आले आहे. त्या सर्व केसरी कार्ड धारकांना धान्य देण्यात यावे. नवीन कार्ड काढताना कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही वर्षभर कार्ड दिले जात नाही. यामुळे स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. परिणामी, ऐपत नसताना त्यांना महागडे धान्य घेऊन गुजराण करावे लागत आहे.
कित्येक नागरिकांना वयाची पन्नाशी गाठल्यानंतरही शिधापत्रिकाच उपलब्ध झाल्या नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांनाही नाव कमी करून आणण्याकरिता सांगितले जाते. अशा नागरिकांना दाखले दिले जात नाहीत. यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या सर्व नागरिकांकडून शपथपत्र घेऊन त्यांना शिधापत्रिका देण्यात याव्या. अर्ज करणाºया नागरिकांना अर्ज केल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांत स्वस्त धान्याचा पुरवठा करावा, अशी मागणीही नागरिकांतून होत आहे.
शिधापत्रिकांतील अनागोंदीमुळे गरजू नागरिकांना हक्काच्या स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. प्रशासनाचेही या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. वरिष्ठ अधिकाºयांनी याकडे लक्ष देत कार्यवाही करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.