पुरवठा निरीक्षकाकडून धान्य विक्रेत्यांची लूट
By admin | Published: March 29, 2015 02:00 AM2015-03-29T02:00:01+5:302015-03-29T02:00:01+5:30
तालुक्यात केरोसीन व स्वस्त धान्य वितरणाच्या व्यवहारात पुरवठा निरीक्षकाने काळाबाजार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.
समुद्रपूर/गिरड : तालुक्यात केरोसीन व स्वस्त धान्य वितरणाच्या व्यवहारात पुरवठा निरीक्षकाने काळाबाजार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. स्वस्त धान्य दुकानदार संघटनेने हा प्रकार उजेडात आणल्याने संबंधित अधिकाऱ्यांकडून दुकाने काढून टाकण्याच्या धमक्या दिल्या जात आहे़ या अधिकाऱ्याविरूद्ध मुख्यमंत्री, अन्न नागरी पुरवठा मंत्री, विभागीय आयुक्त, प्रधान सचिव पुरवठा मंत्रालय यांच्यासह जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.
येथील पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड केरोसीन व स्वस्त धान्य दुकानदारांकडून अनधिकृत पैशाची वसुली करीत असल्याचा आरोप आहे. धान्याची पासिंग करताना ते ५०० ते एक हजार रुपये अतिरिक्त वसूल करतात, असा आरोप करण्यात आला़ एपीएल कोट्यातून धान्य मंजूर केल्यास प्रती क्विंटल २५० रुपये अतिरिक्त मागणी केली जाते़ रक्कम देण्यास नकार देणाऱ्या दुकानदारांना एपीएलचे धान्य मंजूर केले जात नसल्याचे नमुद आहे. या पुरवठा निरीक्षकाने स्वत:च्या स्वाक्षरीचे कार्ड केरोसीन धारकांना वितरित केले. या मोबदल्यात प्रती कार्ड ५५० रुपये वसुली केली. ही बाब वरिष्ठांच्या लक्षात आणून दिल्यावर तहसीलदार यांनी पुरवठा निरीक्षकाच्या कापून स्वत: स्वाक्षऱ्या केल्या; पण कारवाई केली नाही़ यातून अधिकाऱ्याची पाठराखण केल्याचा आरोप होत आहे़(तालुका प्रतिनिधी/वार्ताहर)
स्वस्त धान्य दुकानदार आमने-सामने
या प्रकरणात काही दुकानमालक अधिकाऱ्यांची चूक असल्याचे सांगत आहे तर काही दुकानांचीच चूक असल्याचे सांगत आहे. तसे निवदेन काहींनी शुक्रवारी जिल्हाधिकाऱ्यांना दिले़ या निवेदनात अधिकाऱ्याची चूक नसून तक्रार करणाऱ्या दुकानमालकांची चूक असल्याचे सांगण्यात आले़
राशन दुकानदारांना नियमाप्रमाणे धान्य देण्यात येईल व कोणावरही अन्याय होऊ देणार नाही. जे काही घडले, त्याबाबत मला अद्याप माहिती नाही. पुरवठा अधिकाऱ्याने शिधा पत्रिकेवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. या प्रकरणाचा अहवाल आयुक्ताकडे पाठविला आहे.
- पुष्पलता कुमरे, तहसीलदार, समुद्रपूऱ
माझ्यावर केलेले आरोप निराधार असून तक्रारकर्त्यांचे मी ऐकत नसून दबावाला बळी न पडल्याने मला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे. मोजके दुकानदार सोडल्यास कुणाचीही तक्रार नाही. माझे कार्य योग्य पद्धतीने करीत आहे.
- रमेश गायकवाड, तालुका पुरवठा अधिकारी, समुद्रपूऱ